युवा पिढीने सत्कर्मातून समर्थ व्हावे :- प्रा. शिवाजीराव बारगळ

श्रीरामपूर दि 01/11/2026
आजच्या युवा पिढीने सर्वांगीन दृष्टीने जीवन समर्थ बनवावे असे विचार वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माऊली वृद्धाश्रम व जानकी माऊली निराधार विद्यार्थी वसतिगृहात वाचन संस्कृती व जीवनसमर्थ कृतीसत्राप्रसंगी प्रा. बारगळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते.
प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी वाचन व युवा पिढीचे स्थान स्पष्ट केले. याप्रसंगी लोणी येथील स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्राचे संयोजक व विद्यार्थी उपस्थित होते. वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे व सचिव सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी स्वागत करून वृद्धाश्रमातील श्रीस्वामी समर्थ केंद्राचे उपक्रम समजून सांगितले. दत्तात्रय खिलारी यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. यावेळी प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी वृद्धश्रमासाठी देणगी प्रदान केली. माजी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबुराव उपाध्ये, माऊली वृद्धश्रमातर्फे प्रा. बारगळ यांच्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. लोणी येथील स्वामी समर्थ युवा प्रबोधन केंद्रातील दीपक शिंदे, सौरभ हापसे, प्रेम पंडित यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचा ग्रंथभेट देऊन डॉ. उपाध्ये यांनी सत्कार करून वाचन संस्कृतीसाठी उपक्रम आवाहन केले.
प्राचार्य शेळके यांनी सांगितले की, आजची युवा पिढी जेन झी अधिक जागृत झाली आहे. त्यांनी भक्ती आणि सेवाधर्माची वाटचाल सुरु केली हे विशेष कौतुकास्पद आहे.प्रा. बारगळ सर यांनी आपल्या गेल्या ७० वर्षातील जीवनात जे आदर्श निर्माण केले, ते आजच्या पिढीला दिशादर्शक असल्याचे सांगितले. यावेळी प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी सर्वांना फलाहार देऊन सर्वांना आरोग्यवर्धक व देशभक्तीसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर दत्तात्रय खिलारी यांनी आभार मानले.


