पारिजात- मुंबई” च्या वतीने आदिवासी भागातील ४५० विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्यांचे वितरण

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील एकूण १३ शाळांतील ४५० गरजू विद्यार्थ्यांना पारिजात संस्था मुंबईच्या वतीने व अनिल गंभिरे यांच्या प्रयत्नातून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.
“पारिजात- मुंबई ” ही एक नोंदणीकृत संस्था असून ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजा लक्षात घेऊन तेथे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्याचे अविरतपणे काम करत आहे. त्यांचा हा उपक्रम ९५ जि. प. शाळांमध्ये पोहोचला असुन मराठी शाळा टिकवण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे. ही संस्था पर्यावरणदृष्ट्या देखील प्रयत्नशील असून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे महत्व मुलांना न्यात व्हावे याकरिता मुलांना स्वतः शाळेच्या परिसात १० वृक्ष लाऊन त्यांची जोपासनी करण्यास प्रोत्साहित करत आहे. त्याचबरोबर गावच्या उपलब्ध वनराई व पडीक जमिनीवर ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाच्या समन्वयाने वृक्ष लागवड करण्यास देखील प्रोत्साहित करत आहे. हा अगदी स्तुत्य उपक्रम असून याची पूर्तता शाळांनी केल्यास त्यांना पुन्हा शैक्षणिकदृष्ट्या मदत मिळणार आहे.

सदर शैक्षणिक साहित्य तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंबित, शिसवद, कोथळे, सावरकुटे, माळवाडी (सावरकुटे), खडकी खुर्द, खडकी बुद्रुक, बलठण, करटूलेवाडी(बलठण), वैतागवाडी, करवंददरा, देवाचीवाडी (शिरपुंजे)या एकूण १३ शाळांमध्ये करण्यात आले. सदर शैक्षणिक किटमध्ये दप्तर, वह्या, कंपास पेटी/पाऊच, चित्रकला वही, सराव पुस्तिका, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर , पट्टी , कलर खडू व क्रेओन इ. एकूण १३ प्रकारचे साहित्य आहेत. सदर साहित्याचा शैक्षणिकदृष्ट्या निश्चितच फायदा होणार आहे. सदर शैक्षणिक साहित्य वितरणा प्रसंगी या शाळांच्या आवारात १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. पारिजात संस्थेच्या वतीने रोहन दांगट, अनिल गंभिरे, कौशल जटार, सोहम जटार हे उपस्थित होते. तसेच संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अंबादास भांगरे, साहेबराव घिगे, दत्ता पटेकर, सुनिल मेचकर, किसन साबळे, लक्ष्मण कवटे, राजेंद्र भांगरे, सुनिता धिंदळे, राजू संगारे, सखाराम धिंदळे, बाळू पारधी, यशवंत गिऱ्हे व राजुदास राठोड तसेच सोबत सहशिक्षक सिताराम लहामटे, हरिबा चौधरी, बाळासाहेब बांबळे, दया धिंदळे, दत्तात्रय वाळेकर व रूपाली शेळके तसेच संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
