क्राईम
कोपरगावातील वाळू चोरीतील जप्त वाहनांचा होणार जाहीर लिलाव!

कोपरगाव, दि. २७ जुलै – कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध वाळू चोरी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाहने येत्या २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहेत.
संबंधित वाहन मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आले होते. मात्र त्यांनी शासनाच्या कोषात दंडाची रक्कम जमा केलेली नसल्यामुळे ही वाहने लिलावाद्वारे विक्री करून शासनाचे नुकसान भरून काढण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.
लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक व्यक्ती किंवा संस्थांनी तहसिल कार्यालय, कोपरगाव येथे संपर्क साधावा. लिलावातील अटी व शर्ती, समाविष्ट वाहने, त्यांची हातची किंमत आदी तपशील कार्यालयीन वेळेत मिळविता येतील. या संदर्भातील माहिती तहसिल कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.