इतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली

तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला
– उपमुख्यमंत्री अजित पवार

शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर, २०२५


: ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे आकस्मिक निधन हे राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात आहे, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डीले यांच्या निधनाने कर्डीले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
0000

तळमळीने काम करणारा लोकसेवक हरपला
– उपमुख्यमंत्री अजित पवार
:

राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार, राज्यमंत्री तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य देत समाजसेवेचं व्रत जोपासले. जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या कार्यामुळे राहुरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली. आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.

त्यांच्या निधनामुळे राहुरी, नगर आणि संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आ.‌कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत‌ मोठा विजय मिळवला होता.बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी 1995 मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.‌

नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता.नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात स्वतंत्र ओळख आणि ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व होते नगर, राहुरी भागांत त्यांच्या निधनामुळे भावनिक शोक व्यक्त होत आहे
आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे तर अक्षय कर्डिले यांचे ते वडील होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button