इतर

‘फिटे अंधाराचे जाळे’ पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

भटकळ, देशमुख, अमरापूरकर यांची उपस्थिती

पारनेर दि.२८ प्रतिनिधी – स्नेहालय संस्थेच्या ३६ वर्षांच्या कार्याचा संशोधनात्मक मागोवा घेणाऱ्या ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे, म्हणजेच ‘फिटे अंधाराचे जाळे’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १ नोव्हेंबर रोजी माऊली सभागृह, अहिल्यानगर येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख संवादक म्हणून पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सत्यजित भटकळ तसेच सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापक अशुतोष रामगीर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या वेळी ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ च्या लेखिका मेधा देशमुख भास्करन आणि अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांची प्रकट मुलाखत प्रा. डॉ. दया भोर घेणार आहेत.


हे पुस्तक स्नेहालय संस्थेने एड्स बाधितांसाठी भारतातील पहिला निवासी प्रकल्प उभारताना, देहव्यापारातील महिला-बालकांचा क्रूर वापर थांबवताना तसेच मानसिक आरोग्य आणि पर्यावरणासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवरील २७ तृणमूल सेवा प्रकल्पांमध्ये तरुणाईने दाखवलेली असामान्य कल्पकता आणि धाडस यावर प्रकाश टाकते.
मूळ अहिल्यानगर (अहमदनगर) येथील रहिवासी असलेल्या लेखिका मेधा देशमुख भास्करन त्यांच्या इतिहास संशोधनावर आधारित ‘चॅलेंजिंग डेस्टिनी’, ‘लाईफ अँड देत ऑफ छत्रपती संभाजी महाराज’, ‘महाराणी ताराबाई’ यांसारख्या चरित्रात्मक इंग्रजी लेखनामुळे साहित्य विश्वात प्रसिद्ध आहेत. त्यांनी ४ वर्षांच्या संशोधनानंतर स्नेहालयवर हे पुस्तक लिहिले.
अनुवादिका सुनंदा सदाशिव अमरापूरकर यादेखील नगरकर असून त्यांची ३० हून अधिक अनुवादित आणि स्वतंत्र पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांचे ‘खुलभर दुधाची कहाणी’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन सकाळ प्रकाशनाने केले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी निःशुल्क आणि खुला असून, अधिक माहितीसाठी ७७७०२७५०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्नेहालय परिवारातर्फे अध्यक्षा जयाताई जोगदंड, डॉ. प्रीती भोंबे आणि डॉ. महेश मुळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button