डॉ. रफिक सय्यद यांना ‘सेनापती बापट स्मृती पुरस्कार’ प्रदान

दत्ता ठुबे / दि. २८ पारनेर प्रतिनिधी
सामाजिक सलोखा आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सदभावना मंचाचे प्रवर्तक कार्याध्यक्ष डॉ. रफिक सय्यद यांना गौरव समूह आणि कृषी जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा ‘सेनापती बापट स्मृती पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.
पारनेर येथील स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांचे स्मृती दिनानिमित्त डॉ. रफिक सय्यद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. डॉ. सय्यद यांनी सदभावना मंचच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि विकासासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे.पुरस्कार वितरण समारंभास खासदार डॉ. निलेश लंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने कवी साहेबराव ठाणगे, शाहीर गायकवाड, रा. या. औटी, अर्जुन भालेकर, अरुण आंधळे पाटील, पत्रकार संजय वाघमारे, पत्रकार मार्तंडराव बुचूडे सर, पत्रकार देविदास आबुज, प्राचार्य रंगनाथ आहेर (सर), नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्ष सुप्रिया शिंदे, नगरसेवक योगेश मते, अरुण भंडारी आदींचा समावेश होता.
यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉ. रफिक सय्यद यांच्या विविध विभागीय कार्याचा गौरव केला. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी केलेले काम इतरांना प्रेरणा देणारे आहे. आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन त्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार काढण्यात आले.
गौरव समूह आणि कृषी जनकल्याण प्रतिष्ठान दरवर्षी पारनेर परिसरातील समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या नावाने हा पुरस्कार देऊन सन्मानित करते. डॉ. सय्यद हे या पुरस्काराचे मानकरी ठरल्याने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. पारनेरच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहणे, हीच खरी सेनापती बापट यांना आदरांजली ठरेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सदभावना मंचच्या कार्यकर्त्याचा आहे.पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. सय्यद यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, “विश्वकल्याणासाठी समाज कार्य करत राहणे, हीच खरी सेनापती बापट यांना आदरांजली ठरेल. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सदभावना मंचच्या कार्यकर्त्याचा आहे,” असे नम्रपणे सांगितले.कार्यक्रमाच्या समारोपात आयोजकांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले. डॉ. रफिक सय्यद यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव केल्याबद्दल नागरिकांनीही संस्थेचे कौतुक केले.



