पारनेरकरांवर बिबट्यांची दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

पारनेर : प्रतिनिधी
पारनेर शहरातील वरखेड मळ्यातील भिसे डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने हल्ला करत त्यास गंभीर जखमी केले. या तरूणावर पारनेरच्या ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर नगरच्या रूग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पारनेरकर बिबट्यांच्या दहशतीखाली आहेत.
पारनेर शहरालगतच्या वरखेड मळयाजवळील भिसे डोंगरावर नेहमीप्रमाणे गुरू चारण्यासाठी गेलेल्या सतीश राजाराम कावरे वय ४० या तरूण शेतकऱ्यावर गुरूवारी सकाळी ११ वाजता मादी बिबट्याने अचानक झडप घातली. दगडी पवळीच्या आड दबा धरून बसलेल्या बिबट्याने कोणतीही चाहूल न लागू देता झेप घेतल्याने बेसावध असलेले सतीश हे गंभीर जखमी झाले. दोन्ही हातांवर खोल चिरे पडले असून पायांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.
सतीशचा प्रतिकार
सतीशने क्षणभरही न दवडता स्वतःचा तोल सावरला. हल्ला करणाऱ्या बिबट्याचा त्याने हिमतीने प्रतिकार सुरू केला. इतक्यात त्याचा चुलत भाऊ नीलेश सखाराम कावरे हा त्याच्या मागून जनावरे घेऊन येत असल्याने त्यानेही दगडफेक करत बिबटयास परतण्यास भाग पाडले. लगतच्या शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांनीही सावध होत आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. लोकांची वाढती संख्या पाहून मात्र बिबट्याने तिथून पलायन केले.
स्थानिकांनी जखमी सतीश यांना तात्काळ पारनेरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी गंभीर जखमांवर प्राथमिक उपचार करून त्यांना नगरच्या रूग्णालयात हालवण्याचा सल्ला देण्यात आला. वन विभागाच्या प्रतिनिधींनीही रूग्णालयात येत जखमी सतीश यांच्या उपचाराचे नियोजन केले. वन विभागाकडून त्यांना नगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सतीश यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च वन विभागामार्फत देण्यात येणार आहे.
दिपक लंके यांच्याकडून विचारपूस
घटनेची माहीती मिळताच खासदार नीलेश लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. त्यांनी सतीश तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याशी चर्चा करत त्यांना धीर दिला. लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, मा. नगरसेवक किसन गंधाडे, डॉ. बाळासाहेब कावरे, डॉ. सचिन औटी, नगरसेवक योगेश मते, भूषण शेलार व रायभान औटी हे देखील यावेळी उपस्थित होते.
दीपक लंके यांनी वन विभागाच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. पारनेर शहरातून तीन वर्षांच्या बालकास उचलून नेत बिबट्याने ठार केले. त्यापूर्वी कळस येथे बिबटयाच्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाला. पाडळीआळे येथे बिबटयांच्या हल्ल्यात ९ शेळया मृत्यूमुखी पडल्या. पाळीव प्राण्यांवर होणार हल्ले तर नित्याचेच झाले असून स्थानिक वन अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून ठोस कृतीयोजना राबविण्याची गरज लंके यांनी प्रतिपादित केली.
घटनास्थळी बिबट्याची चार पिले

हल्ल्यानंतर वन विभागाच्या पथकाने भिसे डोंगर परिसराची झाडाझडती घेतली. तपासात बिबट्याची चार लहान पिले आढळून आली. सात-आठ दिवसांची ही पिली सध्या विशेष पिंजऱ्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. तपास पथकाच्या शोधात मादी बिबटचा शोध मात्र लागू शकला नाही. अन्न टंचाई आणि जंगलातील कमी होत चाललेली शिकार यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे वळत आहेत. पिलांमुळे मादी अधिक आक्रमक होण्याची भितीही वर्तविण्यात येत आहे.
पारनेर शहर व आसपासच्या डोंगराळ भागात बिबट्यांचा वाढता उच्छाद गंभीर चिंता निर्माण करत आहे. नागरिकांची सुरक्षितता, शेतकऱ्यांचे, जनावरांचे रक्षण आणि वन्यजीवांचे संरक्षण यांचा समतोल राखत वन विभागाने तातडीने निर्णायक पावले उचलली नाहीत, तर या भागातील भीती अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
▪️



