गाडी, बंगला, नोकरी आहे पण छोकरी मिळेना! पारनेर तालुक्यात उपवर मुलांची लग्न समस्या बनली गंभीर.

सुबत्ता असूनही उपवर मुले वेटिंगवर
दत्ता ठुबे
दि. 17 पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात सध्या एक वेगळीच सामाजिक समस्या डोकं वर काढत आहे. “घर बंगला आहे, शेती आहे, शहरात चांगली नोकरी आहे, पण मुलगी सांगून येत नाही,” ही व्यथा आज तालुक्यातील एका मोठ्या तरुण वर्गाची झाली आहे. वयाची चाळीशी ओलांडली तरी लग्नाचे बोहले चढता येत नसल्याने अनेक तरुण आता नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत.
एकेकाळी पारनेर तालुका हा दुष्काळी मानला जायचा, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. तालुक्यातील अनेक तरुण पुणे, नाशिक,मुंबई ,सारख्या शहरांत मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदस्थ नोकरीला आहेत. काहींनी गावातच आधुनिक शेती आणि व्यवसायात चांगली प्रगती केली आहे. आलिशान बंगले बांधले आहेत, दारात गाड्या आहेत. मात्र, एवढी आर्थिक सुबत्ता असूनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.या समस्येमागे अनेक सामाजिक कारणे असल्याचे जाणकार सांगतात. आजच्या काळात मुलींची आणि त्यांच्या पालकांची पहिली पसंती ही ‘शहरातील स्थिर आयुष्य’ याला आहे. मुलगा कितीही कमावता असला, तरी तो ग्रामीण भागात राहत असेल किंवा त्याची शेती असेल, तर त्याला नापसंती दिली जात आहे. त्यातच, आजच्या काळात मुली शिक्षणात आघाडीवर आहेत. साहजिकच त्यांना आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. १० ते २० वर्षांपूर्वी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेर पडलेला तरुण आता स्थिर झाला असला, तरी लग्नाच्या बाजारात तो ‘वय’ या एका कारणामुळे मागे पडत आहे.
अनेक ठिकाणी ‘वधू-वर मेळावे’ घेतले जातात, मात्र तिथेही ३५ ते ४० वयोगटातील पुरुषांची संख्या मोठी आणि मुलींची संख्या नगण्य असते. यामुळे समाजात एक प्रकारची विषमता निर्माण होत आहे. ही केवळ एका कुटुंबाची अडचण नसून ती एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. वेळीच यावर गांभीर्याने विचार न झाल्यास, ग्रामीण भागातील कौटुंबिक व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
—–===—



