पारनेर शहरात महिलांची स्वच्छतागृहाअभावी मोठी कुचंबना

प्रशासनाचे दुर्लक्ष, महिला संतप्त
दत्ता ठुबे /पारनेर दि. १८
पारनेर शहरात महिलांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.पारनेर शहरात विविध कामानिमित्त येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या महिलांची स्वच्छतागृहा अभावी मोठी कुचंबना होत असून, असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
पारनेर नगरपंचायतला ‘स्वच्छ भारत अभियाना’अव्वल पुरस्कार मिळाला असताना मात्र शहराची स्वच्छता गृहाबाबत अनास्था दिसून येत आहे .पारनेरच्या मुख्य बाजारपेठेत मात्र महिलांना आरोग्याचा धोका पत्करावा लागत आहे.मुख्य बाजारपेठेत एकही सुसज्ज व्यवस्था नाही
पारनेर हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने दररोज तालुक्यातील शेकडो महिला बाजारहाट, बँकांची कामे, शासकीय कर्मचारी आणि दवाखान्यासाठी शहरात येत असतात. विशेषतः बस स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ , वीज वितरण विभाग, ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत,आणि तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन,परिसरात महिलांची मोठी वर्दळ असते. मात्र, या मोक्याच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची वानवा आहे. ज्या ठिकाणी प्रसाधनगृहे आहेत, तिथे स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे.शहरातील काही जुन्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, तिथे पाण्याचा पत्ता नाही. अनेक ठिकाणी दरवाजे तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी विद्युत व्यवस्था नसल्याने सायंकाळच्या वेळी महिलांना तिथे जाणे सुरक्षित वाटत नाही. स्वच्छतेअभावी या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, यामुळे महिलांना मूत्रमार्गाचे संसर्ग आणि इतर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाजारपेठेत आलेल्या एका महिला ग्राहक म्हणाल्या, “आम्ही ग्रामीण भागातून दोन-तीन तासांचा प्रवास करून शहरात येतो. मात्र, येथे आल्यावर नैसर्गिक विधीसाठी जागा शोधताना मोठी अडचण येते. हॉटेलमध्ये जावे लागते किंवा काम अर्धवट सोडून घरी परतावे लागते. लोकप्रतिनिधी आणि नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.”
शहरातील महिलांच्या या गंभीर प्रश्नावर अनेकदा तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नवीन प्रसाधनगृहे उभारणे आणि जुन्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असताना, केवळ कागदोपत्री स्वच्छतेचे दावे केले जात आहेत.
शहरात गर्दीच्या ठिकाणी अद्ययावत ‘पिंक टॉयलेट्स’ (महिलांसाठी राखीव स्वच्छतागृहे) उभारण्यात यावीत. प्रसाधनगृहांमध्ये नियमित साफसफाई आणि २४ तास पाण्याची सोय असावी.
पारनेरच्या विकासाचा दावा करणाऱ्या नगर पंचायत प्रशासनाने महिलांच्या या मूलभूत समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी तालुक्यातील महिला करत आहेत.



