सर्वसामान्य प्राप्तिकर दात्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प.-अॅड.कांतिलाल तातेड.*

नाशिक प्रतिनिधी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेला सादर केलेल्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरा मध्ये कोणतेही बदल सुचविलेले नाहीत. वास्तविक सतत वाढणाऱ्या महागाईमुळे घटणाऱ्या वास्तव उत्पन्नाचे प्रमाण लक्षात घेऊन त्या आधारावर प्राप्तिकर मुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करणे आवश्यक असते. प्राप्तिकर कायद्याचे हे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे वाढलेल्या महागाईचा विचार करता प्राप्तिकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा किमान 15 लाख रुपये करणे आवश्यक असतांना अर्थमंत्र्यांनी ती केवळ चार लाख रुपयांवरच गोठविलेली आहे .
सरकारने नवीन कर प्रणालीत प्राप्तिकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा 12 लाख रुपये न करता ‘सूट’ देण्याच्या मर्यादेत वाढ करून त्याद्वारे 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकर दात्यांना प्राप्तिकर भरावा लागणार नाही, अशी तरतूद केलेली आहे. परंतु बारा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न झाल्यास (किरकोळ सवलत वगळता) सदरची सूट मिळत नसल्यामुळे प्राप्तिकरदात्यांना चार लाख रुपयापेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागतो. गेल्या दहा वर्षात उत्पन्नात वाढ होऊन ते दहा लाख रुपयांपेक्षा जास्त झालेल्या प्राप्तिकरदात्यांच्या संख्येत सहा पटीने वाढ झालेली असून यापुढे या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्या सर्वांना चार लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी देखील दोन कोटी 43 लाख लोकांनी जुन्या करप्रणालीचाच स्वीकार केलेला आहे.
जुन्या करप्रणालीतील 70 प्रकारच्या वजावटी रद्द करून प्राप्तिकरापासून मिळणाऱ्या उत्पन्नात कायमस्वरूपात मोठ्या प्रमाणात वाढ व्हावी, हा सरकारचा नवीन कर प्रणाली लागू करण्यामध्ये मुख्य उद्देश असून सरकारला प्राप्तिकरापासून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एक एप्रिल 2026 पासून लागू करण्यात येणाऱ्या नवीन प्राप्तिकर कायद्यात आगामी काळात या कायद्यात कर आकारणीच्या बाबतीत मोठे बदल करण्यात येणार नसल्याचे सरकारने यापूर्वी स्पष्ट केलेले असल्यामुळे आगामी काळातही करदात्यांना चार लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या सर्व उत्पन्नावर प्राप्तिकर भरावा लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्राप्तिकर दात्यांच्या दृष्टीने हे अत्यंत अन्यायकारक आहे.
=====



