जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अकोले अकोल्यातील महिला कर्मचाऱ्यांची नेत्रदीपक कामगिरी!

अकोले ( प्रतिनिधी ) जिल्हा परिषद अहिल्यानगर अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये पंचायत समिती अकोले च्या महिलानी नेत्रदीपक कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
अहिल्यानगर येथे माऊली सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या शुभहस्ते चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
पंचायत समिती अकोलेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून क्रीडा व सांस्कृतिक प्रकारांत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. जिल्हास्तरीय स्पर्धेतील सामूहिक नृत्य प्रकारात प्राजक्ता मोटे, माधवी गोरे, सुनीता वलटे, स्मिता धनवटे, समता कराळे, पौर्णिमा दारोळे, विस्तार अधिकारी सविता कचरे, कृषी अधिकारी रत्नमाला शिंदे व सुमन खतोडे यांनी “शिवरायांची युगत” या कार्यक्रमात आपली कला सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्राजक्ता मोटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडा प्रकारांत महिला बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवत संघभावना व कौशल्याचे उत्कृष्ट दर्शन घडवले.
टेबल टेनिस एकेरी स्पर्धेत स्मिता धनवटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर टेबल टेनिस दुहेरी स्पर्धेत स्मिता धनवटे व माधवी गोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून यशाची पुनरावृत्ती केली. १०० मीटर धावणे प्रकारात समता कराळे यांनी द्वितीय स्थान मिळवले, तर बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत सुनीता वलटे व स्मिता धनवटे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
विजेत्या स्पर्धकांचे गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी विशेष कौतुक केले आहे. महिला शिक्षकांनी केवळ अध्यापनातच नव्हे तर कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवला असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले. या यशामुळे जिल्हा परिषदेतील महिला शिक्षकांचे मनोबल उंचावले असून त्यांची ही कामगिरी इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
कोट:- सांस्कृतिक कार्यक्रमातील स्टेजवरील सादरीकरण पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी स्वतः उभे राहून टाळ्यांच्या गजरात महिला शिक्षकांचे कौतुक करताना दिसले.



