शिक्षणाने माणसं शहाणी व्हायला हवी पण ती अधिक हुशार झाली – संदीप वाकचौरे

संगमनेर प्रतिनिधी
शिक्षणाने माणसं शहाणी व्हायला हवी आहेत,पण ती अधिक हुशार झाली आहे.त्या हुशारीने तत्वज्ञान,विचारधारेची मोडतोड केली जाते आहे.
योगी अऱविंद यांच्या विचाराची दिशा घेऊन शिक्षण क्षेत्रात काम झाले असते,समाज व राष्ट्राचे चित्र बदललेले असे असे विचार शिक्षण तज्ञ संदीप वाकचौरे यांनी व्यक्त केले
बेंजॉन देसाई फौंडेशनच्या वतीने चालवल्या जाणा-या अनुभूती प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वितरण संभारभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संदीप सिन्हा होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सारंग इंगळे होते.व्यासपीठावर संयोजक मनोज टीबरेवाल,अश्विनकुमार भारव्दाज होते.

आपल्या भाषणात वाकचौरे म्हणाले की,जीवनात शिक्षक व्हायचे असेल,तर केवळ पदव्या हाती असून फारसा उपयोग नाही,तर त्याकरीता जीवनानुभूतीची निंतात गरजेची आहे.अनुभूती म्हणजे उद्याचे विश्व समृध्द करण्याची वाट आहे.अध्यात्माचा अर्थ केवळ बाह्यांगाने सुधारणा नाही,तर अंतरिक सुधारणेची ती वाट आहे.त्यामुळे जीवन जेव्हा अंतरंगाने परिवर्तनाची वाटने प्रवास करेल तेव्हा जीवनाची अतृप्ता संपण्यास मदत करणारे ठरेल.मुळात जीवनात जे दुःख आहे त्यामागे केवळ आपल्या भौतिक सुखाची अतृत्पता हे कारण आहे.त्यामुळे योगी अरविंद यांनी शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना न शिकवता,त्याला विचार करण्यास शिकवणे,त्याच्या अभिरूचीने प्रवास घडू देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.आज विद्यार्थ्यांना आपण लादत आहोत.हे लादणे म्हणजे आपण माणूस होण्याच्या प्रक्रियेपासून दूर घेऊन जाणे आहे.
त्याकाळात त्यांनी मातृभाषेतील शिक्षणाचा विचार प्रतिपादन केला होता.आजच्या बिघडलेल्या परीस्थितीत आपल्याला खरोखर शिक्षणाचा उत्तम मार्ग सापडला तर विद्यार्थ्यांच्या आय़ुष्यात निश्चित बदल झालेला आपणास अनुभवता येईल.
शिक्षण हे केवळ माहितीचे नसते,तर त्यातून स्वतःच्या उन्नतीचा मार्ग अनुभवायचा असतो.आज शिक्षणाने माणसं शहाणी व्हायला हवी आहेत,पण ती अधिक हुशार झाली आहे.त्या हुशारीने तत्वज्ञान,विचारधारेची मोडतोड केली जाते आहे.अशा परीस्थितीत आपण सत्वहिनतेचा प्रवास करत आहोत.त्यामुळे शिक्षणातून आपल्याला माणूस घडवण्यात अपयश आले आहे.शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थी स्वतःच शिकत असतो.त्याला शिक्षक मार्गदर्शन करत असतो.त्यामुळे शिक्षकांनी क्षमता,अभिरूची,कल याचा विचार करून मार्गक्रमन करण्याची गरज आहे.शिक्षकांना स्वतः शिकावे वाटते आहे ही गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.त्यामुळे ही माणसं उद्याच्या समृध्द समाजाच्या विकासासाठी अधिक मह्त्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सिन्हा आपल्या भाषणात म्हणाले की,आपले अनुभवाची मांडणी शिक्षणात अपेक्षित आहे.अनुभव संपन्नता हेच खरे शिक्षण आहे.शिक्षण जितके अनुभवाशी जोडले जाईल तितके ते अर्थपूर्ण होण्यास मदत होईल.त्यामुळे जीवनात आपली प्रेरणास्थाने निश्चित करून,ध्येयाच्या मार्गाने प्रवास केला की,ते निश्चित साध्य करता येते.ही साध्यता आपल्याला शिक्षक होण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.शेवटी शिक्षक होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज असेल,पण त्यापेक्षा अनुभवसंपन्न शिक्षणाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्यायला हवे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अभ्यासक्रमामागील भूमिका मनोज टीबरेवाला यांनी स्पष्ट केली.यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांनी आपल्या अनुभवाची मांडणी करणारे मनोगते व्यक्त केली.भारव्दाज यांनी एकूण आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.



