अंधत्व निर्मूलनासाठी सेवाभाव आवश्यक — जमीर सय्यद

नेप्ती येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद
अ.नगर /प्रतिनिधी
-नगर तालुक्यातील नेप्ती येथे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे व ग्रामपंचायत कार्यालय, नेप्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात असंख्य रुग्णांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली.
समता दिव्य ज्योत अभियानांतर्गत आयोजित या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले असून त्यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात निःशुल्क उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी दिली.
या शिबिराची विशेष बाब म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क करण्यात येणार असून रुग्णांची ने-आण, राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना काळे चष्मे देखील मोफत देण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः डोळ्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. अशा निःशुल्क शिबिरांमुळे सर्वसामान्यांना वेळेत तपासणी व योग्य उपचाराची संधी मिळते, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.” अंधत्व निर्मूलनासाठी जनजागृती व सेवाभाव आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद यांनी केले आहे.
पुढे बोलताना सय्यद म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समता फाउंडेशनसारख्या संस्थांच्या माध्यमातून होत असलेले कार्य अत्यंत स्तुत्य असून अंधत्व निर्मूलनासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. नागरिकांनीही या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच संजय अशोक जपकर, आरोग्य सेवक हर्षल बनसोडे ,माजी सरपंच संजय आसाराम जपकर, सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, रामदास फुले, माजी सरपंच सुधाकर कदम, बाबासाहेब रावळे, अशोक जपकर, रावसाहेब साळुंके , शंकर बेल्हेकर, रुस्काना सय्यद, मुमताज सय्यद, अतुल जपकर, सविता आल्हाट, सोनाबाई जपकर, मंदाबाई राऊत , सबाजी कांडेकर,मच्छिंद्र होळकर, रामराव कांडेकर ,सुलोचना पवार, रमेश बेल्हेकर ,तात्याराम पवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, ग्रामपंचायत कार्यालय, नेप्ती येथे दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी अशाच प्रकारे निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



