इतर

रोटरी क्लब नाशिक आयोजित शेतकरी बाजाराचा नववा वर्धापन दिन साजरा

नाशिक दि 15

रोटरी क्लब नाशिक आयोजित शेतकरी बाजाराचे नवव्या वर्षात पदार्पण* रोटरी क्लब ऑफ नासिकच्या वतीने शेतकरी व ग्राहक यांना थेट जोडणारा रोटरी शेतकरी बाजार गेल्या आठ वर्षांपासून यशस्वीपणे राबविला जात असून यंदा या उपक्रमाने नवव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास सेंद्रिय शेती तज्ज्ञ प्रा. पी. डी. मोराणकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून, तर ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. संजीव सोनवणे, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ नासिकच्या अध्यक्षा रोटे. शिल्पा पारख यांनी उपस्थितांचे स्वागत करून रोटरीच्या विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली. रोटरी शेतकरी बाजाराच्या गेल्या आठ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत त्यांनी भविष्यातही शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची ग्वाही दिली.

प्रमुख मार्गदर्शक प्रा. पी. डी. मोराणकर यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीमालाचा योग्य दर मिळण्यासाठी शेतकरी उत्पादक गट अधिक सक्षम करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट दुवा निर्माण करणारी अशी बाजारपेठ उभारणे ही काळाची गरज असून त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल, बाजारातील फसवणूक कमी होईल आणि ग्राहकांना ताजा, दर्जेदार व आरोग्यदायी कृषीमाल उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

ॲड. नितीन ठाकरे यांनी रोटरीच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उदोजी कॅम्पसमध्ये गेल्या चार वर्षांपासून भरत असलेल्या शेतकरी बाजाराला भविष्यातही संस्थेचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

प्रा. संजीव सोनवणे यांनी सेंद्रिय व शाश्वत शेतीचा प्रसार, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण तसेच कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. हेमराज राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विश्वजीत दळवी व रोटे.लीना बाकरे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. नेहा विधाते व रोटे. चेतन पवार यांनी करून दिला. आभार प्रदर्शन रोटे. सोनाली चिंधडे यांनी केले.

कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिकचे माजी अध्यक्ष ॲड. मनीष चिंधडे , रोटे. ओमप्रकाश रावत, रोटे. दिलीपसिंग बेनिवाल, रोटे. अनिल सुकेनकर, उपाध्यक्ष रोटे. विजय दिनानी, रोटे. शशीकांत पारख, रोटे. स्मिता अपशंकर , रोटे. उर्मिला देवधर, रोटे. विनायक देवधर, रोटे. मकरंद चिंधडे , रोटे. वैशाली रावत, रोटे. लीना कुलकर्णी, रोटे. सोनाल कोटकर, रोटे. रोहित देशपांडे यांच्यासह रोटरीचे अनेक सदस्य व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेतकरी बाजारात नियमित सहभागी होणारे सेंद्रिय शेतीचे कृषिभूषण शेतकरी सदुभाऊ शेळके, गोवर्धन कुलकर्णी, अनंत भाकरे व श्री. देशपांडे यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे.डॉ. नेहा विधाते, रोटे. सुरेखा राजपूत,रोटे. चेतन पवार, मॅनेजर सुधीर वाघ व व्यवस्थापक किरण आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button