पोल्ट्री योद्धा संघटनेचा पुणे पशुसंवर्धन आयुक्तालयावर भव्य मोर्चाचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने पोल्ट्री व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबर रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर व सचिव विलास साळवी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन
करण्यात आले असल्याची माहिती पोल्ट्री योद्धा संघटनेचे राज्य संघटक व संगमनेर अकोले तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी दिली
राज्यात सुमारे दहा लाख पोल्ट्री व्यावसायिक असून गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने
मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोल्ट्री व्यावसायिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
संघटनेने ७ ऑगस्ट रोजी पशुसंवर्धन आयुक्त पुणे यांना निवेदन दिले होते. मात्र त्यानंतरही पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही अथवा बैठक झालेली नसल्याने १ सप्टेंबर2026 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये २२ जुलै २०२४ रोजी भारत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व
करारनाम्याची अंमलबजावणी, पशुखाद्याच्या गोणीवर अन्न घटकांची स्पष्ट व ठळक नोंद करणे तसेच ३१ जुलै २०२५ रोजी पशुसंवर्धन
विभागाला देण्यात आलेल्या कृषी- समकक्ष दर्जाचा प्रत्यक्ष लाभ पोल्ट्री व्यावसायिकांना मिळवून देणे यांचा समावेश आहे.
या आंदोलनासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्य भरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब साबळे, सचिन घोलप यांनी केले आहे



