काय झाडी..काय डोंगार फेम आमदार शहाजीबापू रविवारी कर्जुले हर्या येथे

पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे हॉटेल ” गुवाहाटी” चे होणार उदघाटन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे रविवार, दि. ४ सप्टेंबर रोजी येत आहेत. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, हा त्यांचा गाजलेला डायलॉग आणि त्यातून पुढे आलेली ऑडीओ क्लीप सर्वत्र गाजली. त्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
शहाजी बापू पाटलांची संपूर्ण महाराष्ट्रात सध्या क्रेझ आहे त्यांच्या डायलॉगचे विविध मिम्स बनवले जातात. आमदार शहाजीबापू पाटील पारनेर तालुक्यात येत असल्याने त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तालुक्यातील सर्वांचेच कुतुहल जागे झाले आहे.कर्जुले हर्या गावातील युवा उद्योजक रमेश आंधळे व चेतन निवडुंगे या दोघांनी कल्याण हायवेवर कर्जुले घाटावर नव्याने हॉटेल बांधकाम केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे हॉटेल चोखंदळ ग्राहकांना कुटुंबासह आनंद घेण्यासाठीचे असणार आहे. अगदी हे हॉटेल डोंगराच्या कुशीत असल्यामुळे व सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे सर्वत्र हिरवाई पसरली आहे त्यामुळे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हे हुबेहूब त्या ठिकाणी साकारले गेले आहे आंधळे व निवडूंगे बंधूंनी त्या हॉटेलला नावही गुवाहाटी हॉटेल दिल्यामुळे हॉटेलची सध्या परिसरामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
। शाकाहारी आणि मांसाहारी असे स्वतंत्र व्यवस्था असणार्या या हॉटेलचे नाव ‘गुवाहाटी’ असं ठेवण्यात आले आहे. ठाकरे सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्यात एकनाथ शिंदे यांचे बंड कारणीभूत ठरले. या बंडानंतर बंडखोर आमदार गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये ठेवले गेले होते.सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना त्यांच्या कार्यकर्त्याने फोन केला आणि त्या फोनवर बोलताना शहाजी बापू यांनी उत्स्फूर्तपणे, मोकळेपणाने गप्पा मारल्या. ग्रामीण ढब असणारे बापूंच बोलणं आणि त्याला असणारी कोल्हापुरी, सातारी भाषेचा बाज अनेकांना भावला. त्यांच्या ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ या वाक्यावर अनेक गाणी आली, अनेकांनी त्याची टॅगलाईन केली. आमदार शहाजी बापू हे ‘गुवाहाटी’ या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कर्जुले हर्या येथे येत असून त्यांच्या स्वागताची तयारी झाली असल्याची माहिती हॉटेलचे संचालक रमेश आंधळे व चेतन निवडुंगे यांनी दिली. दुपारी साडेबारा वाजता होणार्या या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आंधळे व निवडुंगे परिवाराने केले आहे.