अहमदनगर

जिल्ह्यातील १२ लाख बालकांना देणार जंतनाशक गोळ्या!

अहमदनगर,प्रतिनिधी

. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमे निमित्त १० ऑक्टोबर २०२२ रोजी ग्रामीण आणि शहरी भागातील तब्बल १२ लाख २१ हजार १७ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. यामध्ये ५ हजार ८८१ अंगणवाड्यांतून २ लाख ९६ हजार ९५ बालकांना आणि ५ हजार ३६५ शासकीय, अनुदानित खासगी शाळांमधून ९ लाख २४ हजार ९२२ मुला-मुलींना या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली‌ आहे.


जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील अंदाजे २८ टक्के मुलांना आतडयामध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील मिळकतीवर याचा विपरीत परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी हे बरेचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. यामुळे बरेचदा शाळेत अनुपस्थित असतात. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दुषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी व शाळेच्या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेच्या निमित्ताने १० ऑक्टोबर २०२२ या दिवशी शाळेमधील ६ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये १ ते ६ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जे लाभार्थी या दिवशी आजारी असेल किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना १७ ऑक्टोबर २०२२ रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये ‘मॉप अप दिनी’ गोळी देण्यात येणार आहे.


ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button