शेवगाव तालुक्यातील ऊस उत्पादकांचे विविध मागण्यांचे साखर आयुक्तांना निवेदन!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
कार्यक्षेत्रातील ऊसाची प्रथम तोडणी झाल्याशिवाय कार्यक्षेत्राबाहेरील ऊस साखर कारखान्यास गाळपासाठी आणू नये. यासह मागील वर्षी ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना जे पैसे द्यावे लागले ते पैसे परत मिळावे, सन २०२२-२३ च्या ऊस गळीत हंगामामध्ये शेतकऱ्याकडून ऊस तोडणीसाठी पैसे घेण्यास कारखान्याकडून प्रतिबंध घालावे व तसे झाल्यास ते पैसे कारखान्याने संबधित ऊस उत्पादक शेतकऱ्यास परत द्यावे अशा आशयाचे निवेदन अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे व जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी .श्री.शेखर गायकवाड , साखर आयुक्त, पुणे यांना आज दिले.
बहुतांशी साखर कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पेटले असून चालू वर्षाचा ऊस तोडणी हंगाम सुरु झाला आहे. कारखाना व्यवस्थापन कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस कमी भावात आणून त्याचे गळीत करतात. तथापी यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचा १४ ते १६ महिन्याच्या ऊसाचे गळीत वेळेत न झाल्यामुळे ऊसाचे एकरी उत्पन्न घटले आहे. सबब जोपर्यंत संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप होत नाही, तोपर्यंत कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गळीतासाठी आणण्यास साखर कारखान्यांना बंदी घालण्यात यावी.बहुतांशी शेतकऱ्यांना ऊस तोडण्यासाठी एकरी ५ हजार, ७ हजार व काही ठिकाणी १० ते १५ हजारांपर्यत पैसे द्यावे लागले आहेत. त्यामुळे मागच्या वर्षी उसतोडणीसाठी एकरानुसार घेतलेले पैसे कारखान्यांनी ऊस उत्पादकास तात्काळ परत करावेत. ऊस वाहतूक करताना जी.टी. (जुगाड) बऱ्याचदा शेतात फसून शेतीचे नुकसान होते. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांवर टाकला जातो. हा खर्च शेतकऱ्यांना न पेलणारा असल्याने शेतकऱ्यांवर तो खर्च टाकू नये.
एखाद्या शेतकऱ्यांनी ज्या कारखान्याकडे नोंद केली आहे. अशा कारखान्याव्यतिरिक्त त्याच्या कौटुंबिक अडचणीसाठी इतर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिल्यास त्याच्या नावासमोर “अन्य विल्हेवाट” असा शेरा दिला जातो. कारखान्यांनी हा नियम रद्द करावा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा त्या क्रमानेच ऊस तोडला जावा. ऊसनोंदीचा प्रोग्राम सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोर्ड वरती गावनिहाय लावण्यात यावा. ऊसाचे वजन झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबरवर त्याच्या ऊसाचे वजन तक्षणी SMS द्वारे कळविण्यात यावे. एखाद्या शेतकऱ्याच्या ऊसाला “उन्नी” सारखा रोग लागला असेल तर तातडीने त्याचा पंचनामा करून तो ऊस अगोदर नेण्यात यावा. “महा-ऊस नोंदणी अॅपवर ऊसाची Online नोंद लावली तर कारखाना प्रशासनाकडून त्याला मान्यता मिळत नाही. शेतकऱ्यांनी Online नोंद केल्यास लगेच Approve करण्यात यावी व तशी माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर देण्यात यावी. काही शेतकऱ्यांना वर्ग २ च्या जमिनीवर ऊसाची नोंद करण्यास काही कारखाने अडवतात, हि बाब चुकीची आहे. वर्ग २ ची जमीन असली तरी शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद करावी.
या मागण्या मान्य न झाल्यास तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करतील असेही या निवेदनात म्हंटले आहे.
, ज्या शेतकऱ्यांना मागील हंगामात ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागले त्या शेतकऱ्यांनी त्याचा अर्ज कारखान्याकडे देऊन त्याची एक प्रत साखर संचालक यांच्याकडे पाठवावी. यासह शेतकऱ्यांनी ऊसतोडीसाठी पैसे द्यायचे नाही व प्रथम कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडीचा आपापल्या ग्रा.प.चा ठराव घेऊन संबंधित कारखान्यांना द्यावा आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यावी. तसेच गाळपासाठी आलेल्या ऊसाचे वजन झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांला तत्काळ मोबाईल वर संदेशद्वारे देण्याचे आदेश सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना देण्यात आले. तसेच अहमदनगर जिल्ह्यात सहकार क्षेत्र सर्वात अगोदर आले परंतु तांत्रिक दृष्ट्या शेवगाव पाथर्डी तालुका १० वर्ष पाठीमागे असल्याचेही श्री शेखर गायकवाड यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी सौ.छायाताई आढाव, सौ.मीराताई गाढे, जगन्नाथ गावडे, आबासाहेब राऊत, रज्जाकभाई शेख, उदयनाना बुधवंत, भाऊसाहेब राजळे, कॉ.रामजी पोटफोडे, राजेंद्र पोटफोडे, विष्णू दिवटे, डॉ.ज्ञानेश्वर डमाळ, भाऊसाहेब बोडखे, भगवानराव डावरे, वैभव पूरनाळे, पांडुरंग गरड, लक्ष्मण वाणी, ज्ञानेश्वर फसले, शेषेराव गिर्हे, बाळासाहेब पाटेकर, अंबादास दिवटे, किसनराव झुंबड, राजेंद्र दोडके, मनोहर कातकडे, सुभाष आंधळे, विक्रम काळे, अर्जुनराव शिंदे, पांडुरंग कळकुटे, शंकर काटे, कारभारी मरकड, मयूर मुजमुले, अशोक आव्हाड, मोतीराम काळे, राहुल काटे, रवी उगलमुगले, योगेश देशमुख, राजू उगलमुगले, रामनाथ आढाव, कृष्णा बडधे, भागचंद कुंडकर, सुनील गवळी, आण्णासाहेब जऱ्हाड, कल्याणराव कमानदार, मुकुंद घनवट, बाबासाहेब कार्ले, तुकाराम कापरे, भारत नजन, नागेश पूरनाळे यावेळी उपस्थित होते.