भारत वैद्यकीय पर्यटनाचे जागतिक केंद्र बनेल: केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय

अहमदनगर प्रतिनिधि :
– केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज महाराष्ट्रात अहमदनगर इथे आरोग्याशी संबंधित विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यात, अहमदनगर येथील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले
तसेच, डॉ विखे पाटील कर्करोग केंद्र आणि डॉ विखे पाटील न्युक्लिअर मेडिसीन सेंटरचा समावेश आहे. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उभारणीत गुंतवणूक करुन, भारत एका निरोगी आणि समृद्ध भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे मत यावेळी आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

यावेळी डॉ मनसुख मांडवीय यांनी, राळेगणसिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे आणि कर्मचारी निवासस्थानांचेही उद्घाटन केले. 702 लाख रुपयांच्या खर्चातून हे प्राथमिक केंद्र आणि निवासी संकुल उभारण्यात आले आहे. तसेच, खर्डा इथल्या राळेगणसिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे आणि कर्मचारी निवासस्थानांचेही त्यांनी उद्घाटन केले. या इमारतींसाठी 560 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्याशिवाय, पाधेगांव इथे, 214 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
त्यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी, डॉ विखे पाटील कर्करोग केंद्र आणि डॉ विखे पाटील न्यूक्लियर मेडिसिन सेंटरचेही उद्घाटन केले. अत्याधुनिक वैद्यकीय साधने आणि उपकरणांनी सुसज्ज अशा ह्या केंद्रातून, रुग्णांना सर्वंकष चिकित्सा आणि उपचार सेवा दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, देश वेगाने प्रगती करत आहे, असे यावेळी बोलतांना डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितले.
सरकारने आरोग्याची विकासाशी सांगड घातली आहे, कारण, केवळ निरोगी नागरिकच देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. “आपला भर निरोगी नागरिकांवर तसेच उपचारांवर असायला हवा. नागरिक आजारी पडणारच नाही, यावर भर देत आपण आधी प्रतिबंधक उपचार पद्धतींवर भर द्यायला हवा, हा विचार करुनच आम्ही आरोग्य आणि निरायमता केंद्रावर भर देत आहोत. असे मनसुख मांडवीय म्हणाले.
