दिवाळीतील सूर्यग्रहण

काय करावे ? काय करू नये?
यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन सोमवार २४ ऑक्टोबर रोजी असून ग्रहण २५ ऑक्टोबर आहे . त्यामुळे लक्ष्मीपूजन साठी ग्रहणाची कोणतीही अडकाठी नाही . कारण लक्ष्मीपूजन झाल्यावर दुसरे दिवशी ग्रहण आहे व ग्रहणाचे दुसरे दिवशी बलिप्रतिपदा आहे . त्यामुळे दिवाळीत जरी ग्रहण आले असले तरी धार्मिक विधीसाठी , पूजेसाठी कोणतीही अडचण नाही.
*ग्रहण माहिती*
यावर्षी अश्विन कृष्ण अमावस्या २५ ऑक्टोबर , मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण आहे . हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे . हे सूर्यग्रहण भारतात ग्रस्तास्त दिसणार असल्यामुळे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्ताला जाईल . त्यामुळे भारतामध्ये कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही . म्हणून स्पर्शकालापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा .
*ग्रहणाचा स्पर्श :-* दुपारी १६:४९
*ग्रहण मध्य :-* दु .१७:४३
*ग्रहण मोक्ष ( सूर्यास्त ) :-* संध्याकाळी १८:०८
*ग्रहणाचा पर्वकाल* :- १ तास १९ मिनिटे राहील .
*ग्रहणाचे वेध*
ग्रहणाचे वेध मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून लागणार असून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामधे भोजन करू नये , स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध इत्यादी करता येईल . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र उत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजेच ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात दुपारी साधारण ४:४९ ते सायंकाळी ६:०८ पर्यंत पाणी पिणे , झोपणे , मलमूत्र ही कर्मे करू नयेत.
*ग्रहणातील कृती*
ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे , पर्व काळामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम , दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे . अशौच असतांना म्हणजे सुतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .
*ग्रहणाचे फळ*
ऋषभ , सिंह , धनु , मकर या राशींना शुभ फल
मेष , मिथुन , कन्या , कुंभ या राशींना मित्रफल
कर्क , तुला , वृश्चिक व मीन या राशींना अनिष्ट फल आहे .
ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .
*मंत्र तंत्र पुरश्चरण*
नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्य काल आहे . पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकालात केल्याने मंत्र सिद्धी होतो .
*स्नानाविषयी*
ग्रहणात सर्व उदक गंगे समान आहे तरीही उष्णोदकाहून शितोदक पुण्यकारक . पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा वाहते पाणी , सरोवर , नदी , महानदी , गंगा , समुद्र यांचे स्नान उत्तरोत्तर श्रेष्ठ व पुण्यकारक आहे . सूर्यग्रहणात नर्मदा स्नानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे . नर्मदास्नान शक्य नसल्यास स्नानाची वेळी नर्मदेचे स्मरण करावे .
*मोक्षस्नान आणि भोजनाविषयी*
या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्षवेळा दिलेल्या नाहीत . तथापि भारतीय प्रमाण वेळेनुसार सर्वात उशिराच्या मोक्ष वेळा नंतर म्हणजे सायंकाळी ६:३२ नंतर मोक्ष स्नान करावे आणि दुसरे दिवशी सकाळी शुद्ध सूर्य बिंब पाहून नंतर भोजन करावे.
*( ग्रहण माहिती व वेळ संदर्भ – दाते पंचांगातुन घेतले आहेत )*
*ज्यां गर्भवतींना या काळात नियम पाळायचे असतील त्यांच्यासाठी नियम :-*
१) या काळात कापणे , चिरणे , पिळणे व शिवणे पूर्ण बंद ठेवावे .
२) पायाची अढी घालून बसू नये .
३) पाणी पितांना त्यात तुळशीपत्र घालून प्यावे .
४) झोप घेऊ नये .
५) शक्यतो देवघरात बसून नामस्मरण करावे .
*ग्रहण शास्त्रार्थ*
चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल, तर त्यानंतर दुसर्या ठिकाणी ते ग्रहण दिसेल; पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून, अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंब जर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल, तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले, तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन, स्नानदानादिक कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहण आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणिग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत.
*आंघोळीला पाणी घेण्याविषयी कमी-अधिकपणा-*
कढत पाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक. दुसर्याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काढून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहाते पाणी पुण्यकारक. वाहात्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकर. सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकर. याप्रमाणेच तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकर. ग्रहणांत वस्त्रासह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकरांनी मुक्ति स्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही, तर सुतकीपणा जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरूरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. काही बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल-स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला, आणि बायको जर विटाळशी असली. तर भांड्यात पाणी घेऊन, त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. तीन दिवस किंवा एक दिवस उपास करून ग्रहणाची स्नानदानादि कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपास करणे असेल, तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांति वगैरे दिवशी उपास करू नये. पुत्रवान् या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून, तशांनीही उपास करू नये असे म्हणतात. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांना सांगितले आहे. ‘सर्व वर्णांना राहुदर्शनाचे सूतक आहे’ म्हणून ग्रहणकालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुऊन शुद्ध करावीत. गाई, भूमि, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले, तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण, तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. ‘चंद्र-सूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व ब्राह्मण व्यासांसारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखी असे वचन आहे . ग्रहणांतले श्राद्ध करायचे ते आमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. सूर्यग्रहणांत तीर्थयात्रांग श्राद्धाप्रमाणे ज्यात तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो. श्रीमंताने ग्रहणांत तुलादानादिक करावे. चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाचे ठिकाणी महापर्वकाळी मंत्राची जर दीक्षा घेणे असेल, तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरूरी नाही. मंत्रदीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात पाहावा. दीक्षा शब्दात उपदेशाचा अन्तर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलियुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला, तर दारिद्र्यादिक दोष प्राप्त होतात असे कोणी सांगतात. ‘आधी उपास करून, चंद्रसूर्याच्या ग्रहणांत स्नान करावे; आणि स्पर्शकालापासून मोक्षकाला पर्यंत एकाग्रचित्ताने मंत्राचा जप करावा, मग जपाचा दशांश होम करावा, आणि नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास, होमसंख्येच्या चौपट जप करावा.’ मूलमंत्राचा जप करून, त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत असा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून,
‘अमुकदेवता तर्पयामि नमः’
असे मोठ्याने म्हणावे. यवादियुक्त अशा पाण्याच्या ओंजळींनी होमाच्या दशांशाने तर्पण करावे. याप्रमाणे ‘नमः’ पर्यंत संपूर्ण मूलमंत्राचा उच्चार करून, अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने ब्राह्मणभोजन घालावे. याप्रमाणे- जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मणभोजन हे पाच प्रकारांच्या रूपाचे पुरश्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल, तर त्या त्या संख्यांच्या चौपट जप करावा. हा जो पुरश्चरणाचा प्रकार सांगितला, तो ग्राससहित उदय अथवा अस्त पावणार्या ग्रहणांत होत नाही. पुरश्चरणसंबंधाने जो उपास करावयाचा, तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरश्चरण करणार्याच्या नित्य नैमित्तिक स्नानदानादिकांचा जर लोप होईल, तर दोष सांगितला असल्याने, स्नानदानादिक कर्मे मुलगा, बायको वगैरे प्रतिनिधींकडून करवावी.
🙏🕉️🙏