दारूच्या नशेत ग्रामसेवकाचा धिंगाणा; पारनेर पंचायत समितीत घडला प्रकार

गटविकास अधिकाऱ्यांना धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल
दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :
पारनेर पंचायत समिती कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या बैठकीत दारूच्या नशेत तर्र असलेल्या ग्रामसेवकाने बीडीओंना धमकी देत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. २८) घडला
. याप्रकरणी गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून संबंधित ग्रामसेवकावर पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय महादू मते असे गुन्हा दाखल झालेल्या ग्रामसेवकाचे नाव असून, तो पुणेवाडी हत्तलखिंडी येथे नेमणुकीस आहे. पारनेर पंचायत समिती कामांचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी किशोर प्रकाश माने यांनी शुक्रवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीला तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना बोलाविण्यात आले होते. अडीच वाजण्याच्या सुमारास ४० ते ४५ ग्रामसेवकांच्या तसेच विस्तार अधिकारी यांच्या उपस्थितीत मीटिंग सुरू झाली.
दुपारी ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक संजय महाद् मते हा बैठकीच्या ठिकाणी येऊन गटविकास अधिकारी यांना म्हणाला की, बैठक बंद करून टाक, आम्हाला कोणत्याही कामाचा आदेश द्यायचा नाही, तू बाहेरून आलेला आहे तुला पाहून घेतो, अशा शब्दांत धमकी दिली. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तसेच, संजय मते हा दारूच्या नशेत अंगावर धावून आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पांढरकर करत आहेत.