दुबईतील जानी विश्वनाथन यांची पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे बीज बँकेला भेट. .

अकोले/प्रतिनिधी –
जगभरात प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या पुढाकाराने व बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या मध्यवर्ती गावरान बियांच्या बँकेला नुकतेच जानी विश्वनाथन- संस्थापक हीलिंग लाइव्हस यांनी भेट दिली.
या भागात निर्माण होणारे अस्सल गावरान व देशी वानांचा प्रसार देशातील इतर राज्यांमध्ये कसा करता येईल हा या भेटीमागे प्रमुख उद्देश होता . भेटीदरम्यान त्यांनी पारंपारिक देशी बियाणे संवर्धन प्रक्रिया समजून घेतली. पारंपरिक पद्धतीने संवर्धन करण्यात आलेल्या विविध पिकांच्या वानांचा अभ्यास त्यांनी केला. पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी त्यांना संपूर्ण कामाची माहिती प्रत्यक्ष शेतात जाऊन दिली . पारंपारिक वानांची शेती व त्यातील राहीबाई यांचे ज्ञान बघून त्या आश्चर्यचकीत झाल्या. शेकडो वर्षांपासून व पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आलेल्या अस्सल देशी वाणांचा साठा बघून त्यांच्यासोबत आलेली अभ्यास करणारी सर्व टीम थक्क झाली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. या भागात पर्जन्यमान चांगले असतानाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासते. खरीप हंगाम संपला की बियाणे निर्मितीचे काम थंडावते. बदलत्या हवामानाचा मोठ्या प्रमाणावर फटका बीज निर्मितीला होत आहे. अजूनही यांत्रिक शेती या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होत नाही त्यामुळे उत्पादन खर्च दुप्पट होतो. मोठ्या प्रमाणात मजूर शेती कामासाठी लागतात .वेळेत शेती कामे न झाल्यास त्याचा फटका उत्पादनाला बसतो. सर्व अडचणींची माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी उपस्थित मान्यवरांना करून दिली.
या भेटीनंतर जानी विश्वनाथन यांनी बायफ संस्थेने महिलांसोबत उभे केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे गौरवउद्गार काढले. या भागातील आदिवासी स्त्रियांसाठी हीलिंग लाइव्हस संस्था भरीव कार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत संतोष सांबरे महाराष्ट्र चीफ – हीलिंग लाइव्हस

स्वप्निल फलके – कृषी तज्ञ ,सुनील पडवळ ,अमृता फलके – सॉफ्टवेअर इंजिनिअर ,पृथ्वीराज सांबरे , एकनाथ सोनवणे कृषी तज्ञ हे मान्यवर उपस्थित होते.