कोरठणला आज चंपाषष्ठी रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांचे आयोजन

दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :
लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान येथे आज (दि. २९) चंपाषष्ठी रौप्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवात श्री खंडोबा म्हाळसा घोड्यावरील भव्य पितळी मूर्ती मंदिराचा सातवा वर्धापन दिन आणि स्वामी गगनगिरी गगनगिरी महाराज मूर्ती ध्यान मंदिराचा सहावा वर्धापन दिन सोहळा होईल. पहाटे ४ वाजता श्री खंडोबा मंगल स्नान, उत्सव मूर्तीचे सिंहासनावर अनावरण, साज शृंगार पूजा व आरती, सकाळी ६ वाजता श्री खंडोबा अभिषेक पूजा आरती, सकाळी ७ ते ९ दरम्यान होमहवन, यज्ञ, सकाळी ८ ते १० संगीत भजन, दिंडी सोहळा, डॉ. विकासानंद मिसाळ महाराज यांचे हरीकीर्तन, त्यानंतर ११ पासून महाप्रसाद वाटप सुरू होयील.
दुपारी १ वाजता चांदीच्या पालखीतून शाही रथात चांदीच्या उत्सव मूर्तीची भव्य मिरवणूक, मंदिर व कोरठणगड प्रदक्षिणा, जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांचा सत्संग दर्शन सोहळा, देणगीदारांचा सन्मान, पालखीचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत चंपाषष्ठी उत्सवाची महाआरती होईल. त्यानंतर श्री खंडोबा गाणी स्पर्धा पार पडेल.
चंपाषष्ठीला हजारो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज धरून देवस्थानतर्फे नियोजन करण्यात आले आहे. वाहने पार्किंगसाठी खंडोबा फाटा आणि मंदिराच्या पूर्व बाजूला सोय करण्यात आली आहे. पारनेर पोलिस व अहमदनगर पोलिस मित्र संस्थेचा बंदोबस्त रा- हणार आहे. देवस्थानतर्फे पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
१९९७ मध्ये सुवर्ण कलशारोहण
कोरठण खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार शुद्ध चंपाषष्ठी ५ डिसेंबर १९९७ रोजी स्वामी गगनगिरी महाराज यांची हस्ते सुवर्ण कलशारोहणाने ३ लाखावर ‘भाविकांच्या उपस्थितीत झाला होता. तेव्हापासून देवस्थानचा हा चंपाषष्ठी महोत्सव सुरू झाला. यावर्षी २५ व्या वर्षाचा भव्य चंपाषष्ठी रौप्य महोत्सव कोरठण गडावर साजरा होत आहे.

चंपाषष्ठी महोत्सवाचे महात्म्य
चंपाषष्ठीला श्री खंडोबा मार्तंड भैरव अवताराने मनी मल्ल दैत्यांचा संहार केला. त्यामुळे सर्व देवी-देवतांना वरदान लाभले. या धार्मिक पार्श्वभूीवर चंपाषष्ठी महोत्सवाचे माहात्म्य आहे. त्यामुळे कुलधर्म, कुलाचार, तळी भंडार करण्याची खंडोबा भक्तांची प्रथा आहे