अकोले तालुक्याचे भूमीपुत्र डॉ.पी डी गांडाळ यांना भारत भूषण पुरस्कार जाहीर

अकोले दि. १८ ( प्रतिनिधी ) – आरोग्य क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल अकोले तालुक्याचे भूमीपुत्र डॉ.पुना दगडू गांडाळ यांना ए.आय.एस.एफ. वैद्यकीय समिती , मिरज ( जि.सांगली) यांचा भारत भूषण पुरस्कार 2023 जाहीर झाला असल्याची घोषणा ए.आय.एस.एफ वैद्यकीय समितीचे राज्याध्यक्ष डॉ.अमोल जाधव यांनी केली आहे.
डॉ.पुना गांडाळ हे अकोले तालुक्यातील ढोकरी (ठाकरवाडी)आताचे अंबिकानगर आहे व सध्या त्यांचे वडील व भाऊ उंचखडक खु। ला राहत आहेत.सध्या ते नाशिक येथे सहाय्य संचालक ,आरोग्य सेवा ( हिवताप ) विभाग नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांनी आरोग्य विभागातील राज्यस्तरीय 42 अशा विविध आरोग्य विषयक कार्यक्रमात TOT प्रशिक्षक म्हणून काम करून महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे .तसेच अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्ह्णून कार्यरत असताना जिल्ह्यातील गाव पातळीवर गोर-गरीब रुग्णांसाठी अनेक मोफत सुविधा दिल्या आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,नाशिक येथे कार्यरत असताना विविध प्रशिक्षणे, पुस्तके लिहिण्याचा सहभाग घेऊन विशेष कार्य केले आहे.किटकजन्य आजाराविरुद्ध प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे नाशिक विभागातील सर्व जिल्हे हिवताप मुक्त करण्याकडे वाटचाल केली आहे.आकाशवाणी व आरोग्य पत्रिकेत लेख लिहून जनजागृती केली आहे.
अशा व इतर अनेक कार्यातून आरोग्य क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून डॉ.पूना गांडाळ यांचे अभिनंदन होत आहे.