मनातील अनावश्यक विचारांची गती कमी करून ध्यानाने बौद्धिक ऊर्जा वाढवा -बाळासाहेब गलांडे

अकोले प्रतिनिधी
मनातील अनावश्यक विचारांची गती कमी करा. ध्यानाने बौद्धिक ऊर्जा वाढवा असे प्रतिपादन सिद्ध समाधी योगाचे प्रशिक्षक बाळासाहेब गलांडे यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव शांताराम काळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास वाणी, प्राचार्या मंजुषा काळे उपस्थित होते.
अभ्यास कसा करावा ?बौद्धिक ऊर्जा कशी वाढवावी ? यासंदर्भात मार्गदर्शन करताना सिद्ध समाधी योगाचे प्रशिक्षक बाळासाहेब गलांडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकातून प्रबोधन केले. विद्यार्थ्यांना योग विद्येचे धडे देऊन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शरीर, आहार, शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे तंत्र म्हणजे प्राणायाम, ध्यान या गोष्टींचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. वर्षभर दररोज दोन वेळा ध्यान केले, मेडिटेशन केले तर विद्यार्थ्यांचे 10 ते 15 % गुण निश्चित वाढतात. मेंदूतील अनावश्यक विचारांचे ट्राफिक जाम झाले तर विषय अवघड वाटतो. त्यामुळे विषय सोपा करण्यासाठी अनावश्यक विचारांची गती कमी करा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. जीवनात निर्माण झालेले नकारात्मक विचार काढून टाका .अशा प्रेरणादायी विचारांची पेरणी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास वाणी यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी व यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी जीवनात आनंद मिळवण्यासाठी सगळ्या गोष्टी करा. त्यासाठी लहानग्यांप्रमाणे निरागस रहा. शरीर व मन चांगले व सुदृढ ठेवा असे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून प्रेरणादायी मार्गदर्शन व मूल्य मिळाल्याने विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोकळ्या मनाने सकारात्मक विचार ग्रहण करत होते. विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी पद्धतीने मूल्य रुजवलेल्याचे त्यांच्या हास्यमधुर चेहऱ्यावरून जाणवत होते .यावेळी सूत्रसंचालन किरण भागवत, प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे, परिचय विनायक साळवे तर आभार सुनिता पापळ यांनी मानले.