गांधी आणि विनोबांच्या प्रेरणेतून मेळघाटात काम – डॉ. रवींद्र कोल्हे

नाशिक : वाचनाची आवड असल्याने शिक्षण घेतानाच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची प्रेरणा मिळाली. त्यातूनच आम्ही पुढे मेळघाटातील बैरागडसारख्या दुर्गम भागात वैद्यकीय सेवेत चांगले काम करू शकलो. शिवाय तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात आम्हाला यश आले, अशी कृतार्थ भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी व्यक्त केली.
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकमध्ये डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्यास निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी रोटरीचे जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि माजी अध्यक्षा मुग्ध लेले यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडिया आणि सचिव ओमप्रकाश रावत उपस्थित होते. कोल्हे दाम्पत्याने यावेळी मेळघाटातील आपला संघर्षमय प्रवास उलगडून दाखवला. या मुलाखतीत ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर जाणीवपूर्वक बैरागडची निवड केली. तेथील वनवासी समाजाला शहरातून आलेला डॉक्टर आपल्यासाठी काम करतो, हे सुरुवातीला प्रथम पटले नाही. मात्र, हळूहळू त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला भाषेची अडचण आली. तद्नंतर आरोग्याबरोबरच कृषी, पशु संवर्धन, वन संवर्धन, पर्यावरण, शिक्षण, वीज, रस्ते, सामाजिक विकास, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य केंद्रे अशा विविध क्षेत्रांत भरपूर काम करता आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्या मेल्घाताची ओळख कुपोषण म्हणून राज्यात होती, तिथे प्रचंड काम करता आल्याने कुपोषण कमी करण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यालाही यश मिळाल्याचे ते सांगतात. आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांच्या बळामुळे आणि वैद्यकीय शिक्षणानंतर समाजसेवेचे व्रत स्वीकारण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या मित्रांमुळे खऱ्या अर्थाने समाजसेवा करू शकलो असे डॉ. रवींद्र कोल्हे यांनी सांगितले. तर काम करण्याचा निर्णय ठामपणे टिकून राहिल्यानेच आदिवासींसाठी काम करणे शक्य झाल्याचे डॉ. स्मिता कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मेळघाटात आदिवासी बांधवांकडून श्रद्धेच्या नावाखाली होणारी पशुहत्या थांबवण्यासाठी ‘आमची मान कापा, पण मुक्या प्राण्यांना मारू नका,’ असे डॉ. स्मिता कोल्हे यांनी त्यांना सांगितले. याचा परिणाम म्हणून मागील ३० वर्षांपासून गावच्या यात्रेत रक्ताचा एक थेंबसुद्धा सांडला नसल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच आदिवासींना त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढण्यास प्रवृत्त केले. सामजिकतेची जाणीव तरुणांमध्ये व्हावी, म्हणून १९९७ पासून ‘तरुणाई’ शिबिराची सुरवात केली असून याअंतर्गत तरुणांना श्रमप्रतिष्ठा, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची, साहसीपणाची आणि ‘स्वत्वा’ची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. मेळघाटातली जैवविविधता, संस्कृती आणि माणुसकी जपण्यासाठी इथे प्रयत्न अशा मुद्यांना स्पर्श करीत मुलाखत उत्तरोत्तर रागात गेली. डॉ. कोल्हे दाम्पत्यानेही दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांचा रोटरीतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित श्रोत्याहीही उत्तम प्रतिसाद दिला. हेतल गाला यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रारंभी प्रफुल बरडिया यांनी प्रास्ताविक केले. सचिव ओमप्रकाश रावत यांनी आभार मानले.