पुण्यातील हा नेता खासदार की साठी झाला उतावीळ!
पुणे प्रतिनिधी
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गिरीश बापट पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
दरम्यान, गिरीश बापट यांना जाऊन अवघे तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपच्या एका नेत्याची तर पुण्यात बॅनरबाजी सुरू झाली आहे. त्यावर या नेत्याचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे.पुण्यात भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार असे बॅनर लागले आहेत. जगदीश मुळीक हे भाजपचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. ते माजी आमदार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुळीक यांच्या नावाचे मोठमोठे बॅनर्स लावले आहेत. त्यावर भावी खासदार जगदीश मुळीक असं लिहण्यात आलं आहे. भावी खासदार जगदीश मुळीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं या बॅनरवर लिहिलं आहे.
आज 1 एप्रिलला जगदीश मुळीक यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स पुणे शहरात लावली आहेत. मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वांचे लक्ष वेधत आहेत.मात्र, या बॅनर्सवर आता टीका करण्यात येऊ लागली आहे. गिरीश बापट यांच्या निधनाला अवघे तीन दिवसही झाले नाहीत अन् त्यांच्या जागेवर दावा करणारे मुळीक यांचे बॅनर्स झळकल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुळीक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सबुरी नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या बॅनर्सवर टीका होऊ लागल्यामुळे कल्याणी नगर परिसरातील बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, हे बॅनर्स झकळल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजपची लाज काढत बॅनर ट्विट केले आहेत. चव्हाण यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा, अशा शब्दात चव्हाण यांनी टीका केली आहे.