अहमदनगर

संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन ओझा यांची निवड!

उपाध्यक्ष सतीश आहेर, कोषाध्यक्ष निलीमा घाडगे तर सचिवपदी सुनील महाले यांची वर्णी

संगमनेर, प्रतिनिधी
शहरातील बहुतेक पत्रकारांचा समावेश असलेल्या संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी नितीन ओझा यांची गुरुवारी सर्वानुमते निवड करण्यात आली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षभरासाठी या निवडी करण्यात आल्या. यावेळी संघाच्या उपाध्यक्षपदी सतीश आहेर, कोषाध्यक्षपदी निलीमा घाडगे तर सचिवपदासाठी सुनील महाले यांची निवड करण्यात आली. संघाने आजवर पत्रकार आणि समाजाला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे, ही पंरपरा अधिक जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न करु अशी ग्वाही निवडीनंतर नूतन पदाधिकार्‍यांनी दिली.

विविध प्रसिद्धी माध्यमांसाठी काम करणार्‍या संगमनेरातील सक्रिय पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन असलेल्या श्रमिक पत्रकार संघाची गुरुवारी (ता.4) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी गेल्या वर्षभरातील कामाकाजाचा आढावा घेतला. वर्षभरात संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख करीत त्यांनी धावपळीचे जीवन जगणार्‍या पत्रकारांच्या आरोग्यावर अधिक भर दिला. ग्रामीण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांना आपल्या आरोग्याबाबतच फारसे गांभीर्य नसते याकडे लक्ष वेधतांना त्यांनी प्रत्येकाने दररोज किमान व्यायामाची सवय लावण्याचा सल्लाही दिला.

मावळते उपाध्यक्ष गोरक्ष नेहे यांनी वर्षभर संघटनात्मक पातळीवर राबविलेल्या विविध उपक्रमांमधून पुरुषार्थाचे समाधान मिळाल्याचे सांगितले. संघाने राबविलेला प्रत्येक उपक्रम समाज आणि पत्रकार यांना केंद्रीत ठेवूनच झाल्याने त्याला पत्रकार आणि समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मावळते सचिव संजय आहिरे यांनी पत्रकार समाजाचे देणं लागतो या भावनेतून गेली वर्षभर विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. सदृढ लोकशाहीसाठी कामकाजाची माहिती असलेले लोकप्रतिनिधी आवश्यक असतात, त्यासाठी पत्रकार संघाने स्थानिक स्वराज्य संस्थांचे गाढे अभ्यासक सारंग कामतेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

नूतन अध्यक्ष नितीन ओझा यांनी स्थापनेपासूनच प्रामाणिकपणे सतत काहीतरी उपक्रम राबवणार्‍या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड होणं गौरवास्पद असल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी एकवटलेल्या पत्रकारांच्या समुहातून या संघटनेचा जन्म झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. यापूर्वीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी संघाचे कार्य अतिशय उंचावर नेवून ठेवले आहे, त्याचे स्थान अढळ ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या टीमवर आल्याचे सांगत अत्यंत तोकड्या मानधनावर अतिशय जोखमीचे काम करणार्‍या पत्रकारांसाठी संघाच्यावतीने विमा कवच देण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सर्वसाधारण सभेला नूतन व मावळत्या पदाधिकार्‍यांसह श्याम तिवारी, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, सचिन जंत्रे, अमोल मतकर, सोमनाथ काळे, अंकुश बुब, धिरज ठाकूर, काशिनाथ गोसावी, मंगेश सालपे, संदीप वाकचौरे, भारत रेघाटे, सुशांत पावसे व संजय साबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

 


अतिशय अल्प मानधनावर काम करणार्‍या पत्रकाराचे जीवन संघर्षमय असते. अशावेळी घडलेल्या एखाद्या दुर्घटनेने त्या पत्रकाराच्या कुटुंबाचेही जीवन उध्वस्त होते. मात्र असे असतांनाही कोणताही पत्रकार आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाही. या परिस्थितीचा विचार करता पत्रकारांच्या कुटुंबाला आर्थिक शाश्‍वतीची गरज आहे, त्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक सदस्याला विमा कवच देण्यासह नियमित वैद्यकीय उपचार कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहोत.

नितीन ओझा

अध्यक्ष : संगमनेर श्रमिक पत्रकार संघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button