शेवगाव शहरातील दंगली मागील मास्टर माइंड शोधुन काढा- अंबादास दानवे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
समाजासमाजात धार्मीक तेढ निर्माण करून दंगली घडविण्यासाठी काही समाज विघातक शक्ती कार्यान्वीत झाल्या असून शेवगावची दंगल ही पूर्व नियोजित असल्याचा संशय असून त्यासाठी गेल्या चार सहा महिन्यात शहरात घडलेल्या विविध घटनांचा सखोल तपास करून या दंगली मागील मास्टर माइंड शोधुन काढून शहरात बोकाळलेले अवैध धंदे कायम स्वरूपी बंद होतील व समाज कंटकांना मिळणारी आर्थिक रसद बंद होईल या पद्धतीची ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे यांनी केले.
शेवगाव शहरात रविवारी (दि.१४) रोजी रात्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त निघालेल्या मिरवणुकीवर झालेल्या दगड फेकीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते ना.दानवे यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शनिवारी दि.२० मे रोजी शेवगाव येथे भेट दिली. यावेळी पार पडलेल्या वरिष्ठ शासकीय अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ.सुनील शिंदे, सहसंपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, जेष्ट्नेते रामदास गोल्हार, एकनाथ कुसळकर, तालुका प्रमुख अॅड अविनाश मगरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे, अशोक गायकवाड, भारत लोहकरे, कॉ.सुभाष लांडे, आदींसह प्रांताधिकारी प्रसाद मते, शेवगावचे तहसीलदार छगन वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गाट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राउत आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून व अभिवादन करून त्यांनी ज्या परिसरात किंवा दुकानावर तसेच घरावर दगडफेक झाली. त्या दुकानदरांची तसेच मारवाड गल्ली, जैन गल्लीतील नागरिकांची भेट घेवून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर शहरातील बालाजी मंदिरात पार पडलेल्या व्यापारी नागरिकांच्या बैठकीत उपस्थितांशि संवाद साधून येथील पंचायत समितीच्या कार्यालयात सर्व विभागाच्या वरिष्ठ शासकीय अधिका-यांची बैठक घेवून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी गेल्या काही दिवसापासून शहर परिसरात बोकाळलेल्या वाळु, मावासह, कत्तलखाना विविध अवैध धंद्यांच्या सूळसुळाटाबाबत तक्रारी केल्या. शहरातील शिवाजी चौकात कायम स्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची तसेच विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक पुजारी यांनी याबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती देवून आत्तापर्यंत ४४ संशयीतांना ताब्यात घेतले असून उर्वरित फरारी आरोपींची शोध मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी विरोधी पक्षनेते दानवे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगारांना शोधुन काढून गावात शांतता प्रस्तापित होईल या पद्धतीची ठोस कारवाई झालीच पाहिजे मात्र निरपराध मंग तो कोणत्याही समाजाचा असो त्याच्यावर विनाकारण कारवाईचा बडगा उगारण्यात येवु नये अशी अपेक्षा व्यक्त केली.