महाराष्ट्र

दंगल विरोधी संवाद बैठकीत ‘सामाजिक सलोखा परिषद’ ची स्थापना


पुण्यातील विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा बैठकीत सहभाग..


दत्ता ठुबे
पुणे – सद्य परिस्थितीत कधी नव्हे ते महाराष्ट्रातील राजकारण दूषित झालेले दिसत आहे. धार्मिक ध्रुवीकरणाच्या अनेक घटनामधून योजनाबद्ध रित्या कट- कारस्थान करून दंगली घडवण्याचा उद्देश काही समाजकंटकांकडून घडताना दिसत आहे. यातूनच कोल्हापूर येथे झालेला तणाव तसेच नाशिक आणि अकोला जिल्ह्यात घडलेला हिंसाचारा सोबतच पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात देखील दंगल सदृश्य निर्माण होणाऱ्या अतिसंवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर समाजात कायमस्वरूपी शांतता अबाधित राखण्यासाठी ‘दंगल विरोधी संवाद’ बैठकीचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.
या बैठकीचे आयोजन रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण, महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष शरद पंडित, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, शिवसेना नेते डॉ. अमोल देवळेकर, जाणीव हातगाडी होकर्स संघटनेचे संजय शंके सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सहा महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी या दंगल विरोधी संवाद बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना आयोजक तथा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, सर्व प्रकारची महागाई, शिक्षण – आरोग्य, नोकऱ्या, वाढणारी बेरोजगारी, वाढणारी उपासमारी व दारिद्र्य, डबघाईला येत असलेले उद्योग- व्यवसाय, यावरून लक्ष हटविण्यासाठी राजकारण्यांकडून दंगली घडविल्या जातात. जेव्हा जनतेच्या भल्यासाठी काहीच करता येत नाही तेव्हा जनतेचे नुकसानच करायचे याचसाठी धार्मिक ध्रुवीकरण घडविले जाते. दंगल आणि हिंसाचारातून कोणाचेच भले होत नाही, हे माहीत असताना देखील मुठभर राजकारण्यांचे ऐकून लोक जाळपोळ करतात. दोन जातींमध्ये- दोन धर्मांमध्ये विष पसरविले जाते, या गोष्टी हाणून पाडण्यासाठी आज स्थापन केलेली सामाजिक सलोखा परिषद वाडी वस्तीवर – तळागाळात जाऊन लोकांमध्ये काम करेल.
माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे म्हणाले की, दंगल घडवणाऱ्यांचे मेंदू आणि प्रत्यक्षात दंगल घडविणारे हात वेगळे असतात. दंगलीमध्ये ज्यांनी ज्यांनी तुरुंगवास भोगला आहे, त्यांना त्यांच्या आई-वडिलांशिवाय कोणीही तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी येत नाही, हे सत्य दगडफेक करणाऱ्यांना आणि कायदा हातात घेणाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. दंगलीत सहभागी होणाऱ्या अल्पवयीन तरुणांचे यामध्ये मोठे नुकसान होते. ज्या तरुणांना भविष्यात चांगले आयुष्य जगायचे असेल त्यांनी हिंसाचारा पासून दूर राहावे, हा संदेश देण्यासाठीच धार्मिक ऐक्य तथा सामाजिक सलोखा परिषदेत आपण सर्वजण ताकदीने काम करूयात असे ते म्हणाले.
शिवसेना नेते डॉ. अमोल देवळेकर म्हणाले की, रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही शारीरिक दृष्ट्या आजारी असणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय सेवा प्रदान करत सुदृढ आणि सशक्त करण्याचे काम करीत आहोत. मात्र समाजात वैचारिकदृष्ट्या आजारी असणाऱ्यांना देखील राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून तसेच सर्वधर्मसमभाव ही संकल्पना पुन्हा समाजात रुजविण्यासाठी धार्मिक ऐक्य तथा सामाजिक सलोखा परिषद कार्यरत ठेवून येथील हिंसाचार व दंगली होणारच नाहीत, या संदर्भातील काम आपण ताकदीने उभे करूयात, असे डॉ. देवळेकर म्हणाले.
संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, शासन आणि प्रशासनावर दंगल रोखण्याची मोठी जबाबदारी असते. मात्र दरवेळी पोलीस व जिल्हा प्रशासन दंगल घडून गेल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठीचे काम करत असताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात दंगल घडूच नये. हिंसाचार होऊच नये, यासाठी योग्य वेळी पावले उचलली जात नाहीत, यामागे होणारी दंगल निमूटपणे शांतपणे पाहत रहा! अश्याप्रकारचे राज्यकर्त्यांचे आदेश असतात का? असे आता लोकांना वाटू लागले आहे. मंदीच्या बेरोजगारीच्या काळामध्ये दंगल होऊन, हिंसाचारामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करणे, कुठल्याही नागरिकाला आता परवडणारे राहिलेले नाही, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यासाठी आज स्थापन झालेली सामाजिक सलोखा परिषद समाजात शांतता राखण्याचे मोठे काम करेल.
महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष शरद पंडित म्हणाले की, कोणत्याही दंगलीचा – हिंसाचारामुळे जाळपोळीमुळे होणाऱ्या घटनांचा सर्वाधिक जास्त परिणाम असंघटित क्षेत्रातल्या गरीब कामगारांवर होत असतो. बँक बॅलन्स असलेल्या लोकांना याचे काही वाटत नसले, तरी हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र दंगलीमुळे रोजगार बुडतात. दंगल विरोधी सामाजिक सलोखा परिषद करीत असलेल्या सर्व कार्यात आमचे असंघटित कामगार पुढे असतील. वस्ती पातळीवर जाऊन ते काम करतील, असे पंडित म्हणाले.
जाणीव हातगाडी हॉकर्स संघटनेचे संजय शंके म्हणाले की, रस्त्यावर हैदोस घालणाऱ्यांच्या मारहाणीच्या घटनांमध्ये सर्वात आधी हातगाड्या उलटल्या जातात. रस्त्यावर होणाऱ्या जाळपोळी मध्ये सर्वात आधी पथविक्रेत्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तमाम हॉकर्स व पथविक्रेते सामाजिक सलोखा परिषदेच्या माध्यमातून समाजात शांतता निर्माण करण्याचे काम करतील.
सदर बैठकीमध्ये राष्ट्रसेवा दलाचे प्रशांत दांडेकर आणि विनोद बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय टिंगरे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विकास सोनताटे, इंजि. मिलिंद केदारे, मिथुन राऊत, माजी पोलीस अधिकारी रोहिदास किरवे व भानुदास मानकर, जाणीव संघटनेचे विलास गोसावी, फारुख तांबोळी, अभिजीत हत्ते तर रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा साठ्ये मारणे, संजय जोशी, संघपाल बनसोडे, कविता डाडर, प्रभा अवलेलू, कौशिक बनसोडे, रेश्मा जांभळे, स्वाती हजारे, नीता जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.
दंगल विरोधी संवाद बैठकीमध्ये अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button