प्रजासत्ताक दिनी दिली जाणार ‘सूर्यनमस्कारातून राष्ट्रवंदना’

75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प
संगमनेर प्रतिनिधी
येत्या प्रजासत्ताक दिनी देशभरातील एक हजार केंद्रांच्या माध्यमातून एकाचवेळी एक लाखांहून अधिक विद्यार्थी सांगितिक सूर्यनमस्कारांचे सादरीकरण करणार आहेत. येत्या बुधवारी दुपारी चार वाजता व्हर्च्युअल पद्धतीने होणार्या या महोत्सवात योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज यांच्यासह गीता परिवाराचे संस्थापक स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज उपस्थित राहणार असून विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दहा लाखांहून अधिक योगप्रेमी या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमाचे प्रकल्प संयोजक डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.
देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या क्षणाला यावर्षी 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे संपूर्ण वर्ष ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने देशभरात सरकारसह विविध सामाजिक व क्रीडा संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले असून गीता परिवार, क्रीडा भारती, पतंजली योगपीठ, हार्टफुलनेस इंस्टिट्युट व राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन या पाच संस्थांनी संयुक्तपणे 75 कोटी सूर्यनमस्कार घालून विश्वविक्रम नोंदविण्याचा संकल्प केला आहे. 1 जानेवारीपासून सुरु झालेल्या या राष्ट्रीय उपक्रमात देशभरातील 30 हजार शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसह एकूण 40 लाखांहून अधिक योगप्रेमी सहभागी झाले असून त्यांच्याकडून दररोज प्रत्येकी 13 सूर्यनमस्कार घातले जात आहेत. 20 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरु राहणार आहे.
प्रजासत्ताक दिनी दुपारी 4 वाजता ‘सूर्यनमस्कारातून राष्ट्रवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी नृत्यवंदना सादर करणार आहेत. 75 कोटी सूर्यनमस्कार उपक्रमासाठी विशेष संगीत तयार करण्यात आले असून एकाचवेळी देशभरातील सुमारे एक हजार केंद्रांच्या माध्यमांतून एक लाखांहून अधिक विद्यार्थी त्यावर सांगितिक सूर्यनमस्कार घालणार आहेत. युट्युब व फेसबुक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशभरातील दहा लाखांहून अधिक योगप्रेमी या देखण्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. आळंदी येथील वेदश्री तपोवनातील वैदीक विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यांच्याकडून तपोवनाच्या निसर्गरम्य परिसरात सूर्यनमस्कारांचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम् राष्ट्रगानाने होईल. हा कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील सर्वात मोठा ऑनलाईन कार्यक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमात योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज व स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. येत्या प्रजासत्ताक दिनी ऑनलाईन पद्धतीने होणार्या दिव्य सोहळ्यास योगप्रेमी नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन प्रकल्प समितीचे डॉ.जयदीप आर्य, उदित शेठ, मिलिंद डांगे व एकता बुडैरलिक यांनी केले आहे.