भेंड्यात मंत्री भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन!

नेवासा प्रतिनिधी।
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधी वक्तव्य करून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करीत रविवार दिनांक १९/११/२०२३ रोजी सकाळी सकल मराठा समाजातर्फे भेंडा येथे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्यास चपलांनी मारून बोंब मारून निषेध केला.सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपलं राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.जोपर्यंत मंञी छगन भुजबळ यांना त्यांची जागा दाखवणार नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही.यावेळी मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षण विरोधात बोलणे बंद करावे, अशी मागणीही करण्यात आली.
सकाळी दहा वाजता समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्तेे एकत्र आले. कागदी पुठ्ठ्याने तयार केलेला मंत्री भुजबळ यांचा प्रतीकात्मक पुतळा आणला. यावेळी ‘भुजबळ, भुजबळ कोण रे..,’ ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे’, ‘कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला. नंतर पुतळ्यास चपलांनी मारहाण करण्यात आली.त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज भेंडा,सौंदाळा उपस्थित होते.