गाडगे महाराजांनी माणसांची मने स्वच्छ केली:-प्राचार्य संपत दसपुते

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन किर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून तत्कालीन समाजातील माणसांचे मने स्वच्छ करण्याचे महान कार्य संत गाडगे महाराज यांनी केले असे प्रतिपादन आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री.संपत दसपुते यांनी केले.
ते आज संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावरून बोलत होते. पुढे बोलताना प्राचार्य दसपुते म्हणाले की समाजातील विशिष्ट घटकांकडून गोरगरीब अडाणी जनतेची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक केली जात होती. समाजामध्ये अनिष्ट प्रथा चालीरीती रूढी परंपरा यांचे प्राबल्य होते. अशा वेळी संत गाडगेबाबांनी माणसातील देव शोधण्याचे महान कार्य केले. त्यांनी देव देवळात नाही, दगडात नाही, तर माणसात आहे हे आपल्या कार्यातून जनतेला पटवून दिले. तसेच देव शोधन्यासाठीची दृष्टी देण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या या महान कार्यामुळेच अमरावती विद्यापीठाला राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आले.बाबांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचा व प्राणीमात्रावर दया करण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महान कार्य करावे असे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिश्चंद्र मडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संत गाडगे महाराजांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शालेय परिसर स्वच्छ केला. तसेच संत गाडगेबाबांच्या वेशभूषेतील विद्यार्थी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी विद्यार्थ्यांनी गाडगे महाराजांबद्दल सुंदर भाषणे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी प्रास्ताविक रामदास पांढरे यांनी तर आभार पंढरीनाथ पल्हारे यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड,पर्यवेक्षक सुनील आव्हाड, ज्येष्ठ शिक्षक बापूसाहेब डमरे,सहदेव साळवे,अविनाश भागवत व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी योगेश तायडे, रागिणी लबडे,भाग्यश्री गडाख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू- भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.