इतर

सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी गिरवले अर्थ साक्षरतेचे धडे !


अकोले/प्रतिनिधी
आपण झोपेत असतानाही आपल्यासाठी आपल्या पैशांनी काम केले पाहिजे. श्रीमंती प्रत्यक्षात उतरण्यासाठी व आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त होण्यासाठी महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपली स्वप्ने साकार केली पाहिजेत. त्यासाठीचे आर्थिक नियोजन म्हणजेच अर्थसाक्षरता होय असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी केले.


सत्यनिकेतन संस्थेच्या रा. वि.पाटणकर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या संकल्पनेतून ‘ गोष्ट पैशा – पाण्याची ‘ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कडलग यांच्या मार्गदर्शनाने अर्थ साक्षरतेचे धडे गिरवले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, प्रा.शरद तुपविहिरे , प्रा.रमेश शेंडगे, प्रा.संतोष कोटकर, प्रा.बाळासाहेब घिगे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी उपस्थित होते.
कडलग यांनी अगदी डेबिट कार्ड कसे वापरावे, गुगल पे, फोन पे अॅपचा वापर कसा करावा,याबद्दल मार्गदर्शन केले. आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. अर्थसाक्षरतेने मोठे आर्थिक निर्णय घेणे सोपे होतात.आर्थिक उद्दिष्टय साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंड, एसआयपी,शेअर मार्केट,लिक्विड फंड,टर्म इन्शुरन्स,आरोग्य विमा, अपघात विमा यांचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे.आर्थिक नियोजनात
आरोग्य विमा नसेल, तर अचानक मोठे
आजारपण आले, तर आपली सर्व बचत, गुंतवणूक त्यातच खर्ची पडू शकते.आर्थिक नियोजनात आयुर्विम्याचे व अपघाती विम्याचे कवच घेतले असल्यास कमावत्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे किंवा अपघाती कायमस्वरूपी अपंगत्वामुळे येणारे आर्थिक संकट टाळणे शक्य होते.
आर्थिक आरोग्यासाठी बचत करण्याबरोबर गुंतवणूकही महत्वाची ठरते.कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते,तसेच नियमित गुंतवणुकीमुळे आर्थिक आरोग्य चांगले राहते.कडलग यांनी इच्छा व गरज,बचत व गुंतवणूक यांतील फरकही समजावून सांगितला.
भारताची ६०% हून अधिक लोकसंख्या ही युवक वर्गाची आहे. भारतातील युवक खर्च करत आहेत. त्यामुळे कंपन्यांचा नफा वाढून शेअर बाजारही वाढत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीचा वेग वाढत असल्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या संपत्ती निर्माण मध्ये होत आहे.
ज्या देशात खर्च होतो,तोच देश संपत्ति निर्माण करतो.म्हणूनच भविष्यात गुंतवणूकदार म्युच्युअल फंडच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करतील. भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाने ५० लाख कोटींचा टप्पा ओलांडला असून त्याची आश्वासक वाटचाल आता शंभर लाख कोटींकडे चालू झाली आहे.अमेरिका आणि चीनचा इतिहास बघता त्या देशांत अडीच ते पाच ट्रिलियन डॉलरच्या प्रवासात त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला होता तोच ट्रेंड आता भारतात पाहायला मिळत आहे.
भारताची अर्थव्यवस्था आता ३.७ ट्रिलीयन डॉलरची झाली आहे आणि येत्या दोन वर्षांत ती पाच ट्रिलीयन डॉलर पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या गुंतवणूकदार १७ हजार करोडपेक्षा अधिक रक्कम प्रति महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड योजनेत गुंतवित असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सामान्य माणूस कोट्याधीश होऊ शकतो.पाश्चात्त्य देशांमध्ये प्राथमिक शिक्षणातच अर्थ साक्षरतेचा समावेश केला गेलेला आहे.भारतातही त्याचे अनुकरण होणे आवश्यक असल्याचे मत कडलग यांनी व्यक्त केले.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी कार्यक्रमाचे महत्व व उद्देश स्पष्ट केला. प्रा.शरद तुपविहीरे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करवून दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन लगड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button