टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या पुढाकारातून पळवे खुर्द येथे तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशनच्या वतीने पळवे खुर्द येथील शेळके मळ्याच्या तलावातील गाळ काढण्याच्या कामास शिवरात्रीच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.
पळवे खुर्द येथील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला.शेळके मळ्याच्या तलावातील गाळ काढण्याबरोबरच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. शेळके मळ्यातील हा तलाव मोठा असून या कामासाठी वीस दिवसाचा कालावधी लागेल असे टाटा मोटर्सच्या वतीने सांगण्यात आले. शेतीच्या सिंचनासाठी विविध गावांमध्ये तलाव बांधण्यात आले असून वर्षानुवर्षे त्यात गाळ साचल्याने त्याची साठवण क्षमता अतिशय कमी झाली आहे.साठवण क्षमता कमी झाल्याने या तलावाच्या पाण्यावर होणारे सिंचनही घटले असून याचा फटका शेतकरी वर्गाला बसतो आहे. तलावामध्ये साचलेला गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी नाम फाउंडेशन,टाटा मोटर्स यांसारख्या स्वयं सेवी संस्था पुढाकार घेत असून या स्वयंसेवी संस्थाप्रति शेळके मळ्यातील नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शेळके मळ्याच्या तलावातील गाळ काढून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण ही करण्यात येणार असल्याने तलावाची साठवण क्षमता वाढुन शेतीच्या सिंचनासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे दरम्यान विविध तलावांमधील पाणी साठा संपल्याने गावागावांमध्ये तलावातील गाळ काढण्याची सुरुवात झाली असून अनेक शेतकरीही तलावातील गाळ काढून आपली शेती सुपीक करण्यासाठी घेऊन जात आहेत.
