
अकोले, प्रतिनिधी —
येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी व १२ वी वर्गातील आज १११७ विद्यार्थ्यांना कोराना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यात आला असून राहिलेल्या १०४१ विद्यार्थ्याना शुक्रवारी ( दि. ४ ) रोजी दुपारी एक वाजेपर्यंत लसीकरण कार्यक्रम ठेऊन लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी दिली.
राज्य शासनाने कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात येता येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयात एकूण २१५८ विद्यार्थी असून या सर्वाना लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक होते. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त मधुकरराव पिचड, कायम विश्वस्त सीताराम पाटील गायकर, कायम विश्वस्त वैभवराव पिचड व संस्थेचे पदाधिकारी यांचे सूचनेनुसार आज महाविद्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनी आज तातडीने आवश्यक तो लस साठा उपलब्ध करून दिला. अकोले पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्यामकांत शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आजचे शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. पहिल्याच दिवशी १११७ विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर उर्वरित १०४१ विद्यार्थ्यांना शुक्रवारी लस देण्यात येणार आहे. राहिलेल्या या सर्व विद्यार्थ्यांनी उद्या लसीकरण घेण्याचे आवाहन प्राचार्य शेळके यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष जे.डी. आंबरे पाटील, उपाध्यक्ष मधुकर सोनवणे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, सह्सेक्रेटरी भाऊसाहेब गोडसे, खजिनदार एस.पी.देशमुख व सर्व कार्यकारिणी सदस्यांचे लसीकरण कार्यक्रम यशस्विततेसाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भिमाजी पळसकर. पर्यवेक्षक प्रा. गणपत नवले व सर्व प्राध्यापक व कर्मचारी लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.