इतर

दुधाला 40 रुपये दर मिळावा मागणीसाठी अकोलेत संघर्ष समितीची निदर्शने

अकोले प्रतिनिधी

दुधाला किमान प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली.

सरकारच्या धोरणामुळे वर्षभर दूध उत्पादकांना आपले गाईचे दूध 15 ते 16 रुपये प्रति लिटर तोट्यात विकावे लागत आहे. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकार शेतकरी विरोधी धोरण सोडायला तयार नाही. दुधाचे भाव 26 रुपये प्रति लिटरपर्यंत खाली आले असताना, सरकारने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा अत्यंत शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रभरातील शेतकरी यामुळे हवालदील झाला असून तीव्र संतापाची लाट सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात निर्माण झाली आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा व विविध शेतकरी संघटनांनी या पार्श्वभूमीवर 28 जून पासून सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची हाक दिली आहे.

महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकरी, विविध संघटनांच्या माध्यमातून उत्स्फुर्तपणाने रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा व विविध जन संघटनांच्या वतीने अकोले तहसील कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, आर. डी.चौधरी, लक्ष्मण नवले, नंदू गवांदे, राजू गंभीरे, प्रकाश साबळे, आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये दुधाला 40 रुपये किमान दर मिळावा, राज्य सरकारने बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करून त्यात वाढ करत किमान 10 रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांना द्यावे, दूध पावडरच्या आयातीवर बंदी घालावी व दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे, दुधाला एफ. आर. पी. व रेवेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ बंद करावी, पशुखाद्याचे दर कमी करावेत, मिल्को मिटर व वजन काट्याच्या माध्यमातून होत असलेली शेतकऱ्यांची लूट बंद करण्यासाठी ठोस पावले टाकावीत, राज्यात दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करून दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेल यासाठी कायदेशीर हमी द्यावी, खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा कायदा करून दूध संघांच्या मनमानी कारभाराला लगाम लावावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसील, अकोले यांनी यावेळी निवेदन स्वीकारले.

राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष, समिती, किसान सभा व विविध शेतकरी संघटनांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button