मनसेच्या आंदोलनामुळे पारनेर तहसील मधील ७०० प्रकरणे मार्गी लागले
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तहसिल कार्यालयात गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेशन कार्ड व सेतू सुविधा केंद्रातून विद्यार्थ्यांसह पालकांची होणारी लूट थांबवावी यासह विविध मागणीसाठी मनसेच्या वतीने गुरूवार दि.११ रोजी सुरू केलेले आंदोलन आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र सर्व मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान रेशन कार्ड संदर्भात रात्री कामकाज सुरू केल्यामुळे पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, नायब तहसीलदार आढारी साहेब यांनी १५ दिवसांत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुकारलेले बेमुदत ठिय्या आंदोलन १५ दिवसांसाठी स्थगित करण्यात आले, जर १५ दिवसात रेशन कार्ड संदर्भात तसेच सेतु कार्यालयात होत असलेली विद्यार्थ्यांची लुट थांबली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष राहुल दादा शिंदे पाटील, पारनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, मनसेचे नितीन म्हस्के, कडूस ग्रामपंचायतीचे सदस्य नारायण नरवडे, अक्षय सुर्यवंशी, बबन गुंड, कडूसचे सरपंच मनोज मुंगसे, पिंपरकर, फिरोज शेख यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
– वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रेशनकार्ड संदर्भात नागरिकांना पुरवठा विभागाकडून तारीख पे तारीख दिली जात असे, यात नागरिकांसह जेष्ठ नागरिक हेलपाटे मारून थकले परंतु रेशनकार्ड मिळेना, रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली. संबंधित एजेंट मार्फत पैसे पण दिले मात्र तरीही रेशनकार्ड मिळेना मात्र गुरूवारी मनसेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन छेडताच पुरवठा विभाग सुतासारखा सरळ झाला व नागरिकांचा काही अंशी प्रश्न मिटला असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.
– रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालय सुरू !
रेशनकार्ड सह विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी गुरूवारी मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. यादरम्यान पुरवठा विभागाकडून सुमारे ७०० प्रकरणे मार्गी लावण्यात आली. गुरुवारी दिवसा व रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयात नागरिकांच्या रेशनकार्ड संदर्भात कामे सुरू होती. यात नवीन रेशनकार्ड देणे, नावात बदल करणे, रेशनकार्ड ऑनलाईन करणे, रेशनकार्ड दुरूस्ती करणे आदी कामे रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पारनेर तहसीलदार गायत्री सौदाने आणि नायब तहसीलदार गणेश आढारी यांनी दिलेल्या प्रलंबित रेशनकार्ड १५ दिवसांत मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. पारनेर तालुक्यात गावा गावातील घरा घरात रेशन कार्ड पोहचविनार.शासनाच्या अन्न धान्य आणि सुविधांपासून सर्व सामान्य नागरिकांना वंचित राहू देणार नाही. तहसीलदार यांनी आश्वासन पाळले नाही तर वेळप्रसंगी संघर्ष करून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी मागे हटनार नाही-
मनसे नेते अविनाश पवार.