नेप्तीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथे विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभात फेरी काढली होती. या फेरीत स्वच्छता अभियान ,पर्यावरण संवर्धन व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन गवत उपटून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ केला.
सावता महाराज मंदिरासमोर समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहू होले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच सविता संजय जपकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामस्थांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व ध्वजगीत त्याचे गायन केले. सीए परीक्षा पास झाल्याबद्दल तन्मय बंडू पुंड यांचा ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच विठ्ठल जपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहू होले म्हणाले कि, भारताला गौरवशाली स्वातंत्र्य लढाईच्या इतिहासाची परंपरा आहे.स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या सर्वांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम आपण करत असतो .स्वच्छता अभियान ,पर्यावरण संवर्धन आरोग्य शिबिरे, वृक्षारोपन, गरजूंना मदत या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण देश सेवा करू शकतो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, असे ते म्हणाले.
