निळवंडे वितरण व्यवस्थेसाठी 800 कोटींची तरतुद – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

संजय महाजन
शिर्डी प्रतिनिधी
निळवंडे धरणाच्या कालव्याचे व पोटकालव्यांचे अस्तरीकरणाची कामे निधी अभावी रखडलेली होती, यासाठी जून – 2024 मध्ये शिर्डीचे महाविकास आघाडीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याला नुकतेच गोड फळ आले असून केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांनी नाबार्ड बँकेकडून 800 कोटीची आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली, त्यामुळे निळवंडे कालवा कृती समिती व लाभधारक शेतकरी यांनी समाधान व्यक्त करत जल्लोष केला आहे.

, उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी 14 जुलै रोजी 54 वर्षे उलटले आहे. दरम्यान हा प्रकल्प 7.93 कोटी वरून पाचव्या सु.प्र.मा. 5 हजार 177 कोटींवर गेला आहे. यात प्रारंभीपासून निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील कालवा कृती समितीने न्यायिक व आंदोलनात्मक पण महत्त्वाची भूमिका निभावली आहे. खा.वाकचौरे यांनी समितीला केंद्रीय जल आयोगाच्या 17 पैकी 14 मान्यता मिळवून देण्यात 2014 पूर्वी अहम भूमिका निभावली होती. त्यानंतरच्या पुढील तीन मान्यता उच्च न्यायालयातून मिळवण्यात अड.अजित काळे यांच्या माध्यमातून समितीचे याचिकाकर्ते नानासाहेब जवरे, गंगाधर राहाणे, विक्रांत काले यांच्यासह निळवंडे कालवा कृती समितीने यशस्वी निभावली आहे. आता मात्र हा कालवा अस्तरीकरणाची कामे पूर्ण न झाल्याने अडचणीत सापडला होता. त्यामुळे नव्याने 2024 मध्ये झालेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडून येताच तात्काळ प्रलंबित निळवंडे कामासाठी परत पाठपुरावा सुरू केला आणि केंद्रीय जलसंधारण मंत्री श्री. पाटील यांच्यामार्फत नाबार्ड बँकेकडून रुपये ८०० कोटींची आर्थिक तरतूद करून घेतली आहे. त्यामुळे आता लवकरच निळवंडे क्षेत्रातील लाभधारकांना आपले हक्काचे पाणी मिळणार आहे.

निळवंडी धरणाबाबत कायम राजकारण केले गेले असून खासदार वाकचौरे मात्र जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देत आले आहे. कुठल्याही श्रेयवादात न जाता हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी कालवा कृती समितीच्या पाठपुराव्याने केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील यांची भेट घेऊन या प्रकल्पाची सद्यस्थिती लक्षात आणून दिली होती. त्यानंतर श्री. पाटील यांच्या सूचनेनुसार नाबार्डच्या केंद्रीय समितीने निळवंडे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली व तात्काळ अंतर्गत आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे निळवंडे प्रकल्पास आता निधीची चणचण भासणार नाही व कालव्याच्या अस्तरीकरणासह नलिका वितरण व्यवस्था पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
याबाबत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, नानासाहेब गाढवे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, पाटपाणी समितीचे उपाध्यक्ष उत्तमराव घोरपडे, माजी अध्यक्ष गंगाधर गमे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ यांनी सदर निर्णयाचे स्वागत केले तर महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे राजेंद्र झावरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे मुकुंद सिनगर, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे आणि काँग्रेसचे नितीन शिंदे आदींनी खा.वाकचौरे यांचे लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.