मुस्लिम साहित्यिकांनी रचनात्मक कार्यासाठी लेखन करावे.- डॉ जयद्रथ जाधव
लातूर:- मुस्लिम साहित्यिकांना नवेविचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम ग्रामीण मराठी साहित्य संमेलन महत्त्वाचे ठरत आहे. अशी संमेलने साहित्यिक देवाणघेवानांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात.मराठी साहित्यात मुस्लिम साहित्य प्रवाह प्राचीन-अर्वाचीन काळापासून आहे.त्यांची एक स्वतंत्र परंपरा व भूमिका आहे. ही भूमिका अखंड मानव मुक्तीची आहे. यापुढेही मुस्लिम साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून सामाजिक, राजकीय विद्वेषात न गुरफटता साहित्यातून रचनात्मक लेखन करावे, असे प्रतिपादन जयद्रथ जाधव यांनी केले. तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लातूर येथील “वर्तमानात मुस्लिम साहित्यिकांची भूमिका” या परिसंवादाच्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते.या परिसंवादात रामराजे आत्राम,नौशाद उस्मान,नसीम जमादार हे सहभागी होते.यावेळी नौशाद उस्मान यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुस्लिम साहित्यिक हे मराठी भाषेचे एकरूप होऊन लेखन करतात.साहित्यातून सकारात्मक व समन्वयाची भूमिका त्यांची असते. मुस्लिम साहित्य हे इस्लाम धर्माचा विचार आपल्या साहित्यातून प्रसारित करते. एकता, इमान, प्रेषित आणि लोककल्याणाचा साहित्यातून मांडला जातो.दुसऱ्या वक्त्या नसीम जमादार यांनी सांगितले की,प्रत्येक समाजाचे भावविश्व आणि सांस्कृतिक विश्व हे वेगळे असते. त्या भावविश्वाचा वेध मुस्लिम साहित्य घेते. मुस्लिम साहित्य हे मराठी भाषेतील सर्वच साहित्य प्रकारातून लिहिले जाते आहे.साहित्यातून मूल्यविचार आहे. सुफी संतांनी लोकभाषांना चालना देत समाजामध्ये सोहार्दाचा विचार दिला.मुस्लिम समुदायातील वेदना,दुःख आणि मुस्लिम अस्मितेचे चित्रण करावे असे विचार मांडले. तर रामराजे अत्राम यांनी साहित्य हे साहित्य असते ते कोणत्याही विशिष्ट जाती आणि धर्माशी निगडित असू शकत नाही असे ते म्हणाले, साहित्याने निखळ मानवतेचा, राष्ट्रवादाचा आणि समाजाचा विचार करावा असे सुचित केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. जयद्रथ जाधव यांनी या तिन्ही वक्त्यांचा आढावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.हे संमेलन लातूरकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. लातूरमध्ये यापूर्वी दलित, विद्रोही, वीरशैव, बौद्ध, वारकरी, जैन, मराठवाडा, ग्रामीण अशी सगळी साहित्य संमेलन झालेली होती हे तिसरे फातिमाबी शेख मुस्लिम ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आज होऊन लातूर मधील साहित्य संमेलनाचे वर्तुळ या निमित्ताने पूर्ण होते आहे. साहित्य अस्मितेच्या शोधात असते. मुस्लिम माणसांच्या प्रत्येकातील वास्तव जगण्याच्या चित्रणातून जन्माला आलेले साहित्य हे मुस्लिम साहित्य ठरते. हे साहित्य वास्तवासी एकरूप होऊन लिहिले जाते. यापुढेही या साहित्याने सामाजिक एकतेच्या विरोधातील विद्वेषी राजकारणाला आपल्या साहित्यातून उत्तर द्यावे. मुस्लिम समाजाबद्दल समज व गैरसमजुती मधून निर्माण झालेला विसंवाद दूर करून साहित्याच्या लेखनातून समाजात सुसंवाद निर्माण करावा. मुस्लिम व हिंदू समाजातील एकतेच्या समन्वयाच्या व प्रथा परंपरेची मांडणी साहित्यातून करावी.तसेच स्व अस्मितेचा शोध घेत मुस्लिम समुदायातील उपेक्षित घटकांशी नाते जोडून त्यांच्या व्यथा, वेदनांचे चित्रण करावे मुस्लिम समुदायातील अज्ञान, दारिद्र्य, स्त्रियांचे प्रश्न प्रकर्षाने मांडावे. असे विचार व्यक्त केले. यावेळी सभागृहात संमेलन अध्यक्षा मलिका शेख, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे केंद्रिय अध्यक्ष अँड.हाशम पटेल, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बाेल्डेकर,संमेलनाचे स्वागताध्यक्ष इस्माईल शेख,लातूर जिल्हयाच्या अध्यक्ष तहेसिन सय्यद,अनिसा शेख,राजेसाहेब कदम, दिलीप गायकवाड,रामदास कांबळे, सतीश सुरवसे, रमेश हणमंते, खाजाभाई बागवान,जाफरसाहब शेख,अँड.सिमा पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित हाेते.