राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे उत्सवात सम्पन्न

विलास तुपे
राजूर/ प्रतीनिधी
प्रगतिशील लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधव द्वारा पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे अँड देशमुख महाविद्यालयात या ठिकाणी एकदिवशीय आदिवासी साहित्य संमेलन उत्सवात पार पडले.राजुर सारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ होती. अँड. एम एन देशमुख महाविद्यालय राजुर येथे झालेल्या एकदिवशीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

यावेळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्यामध्ये युवक युवती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला. तसेच महाराष्ट्राची प्रगतिशील परंपरा तिचे दर्शन होईल अशी रचना करण्यात आली होती. अनेक आदिवासी बांधव पारंपारिक आदिवासी वेशभूषेमध्ये या संमेलनासाठी उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्ष मा.राकेश वानखेडे तर संमेलनाचे उद्घाटक भोराबाई गांगड, साहित्यिक संजय दाभाडे यांनी केले तर स्वागताध्यक्ष आयुक्त वसंत पिचड हे होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कादंबरीकार राकेश वानखेडे म्हणाले की, मराठी साहित्यातील प्रचलित प्रवाहांपैकी लिटिल मॅगझिनची चळवळअसो, ग्रामीण साहित्य असो, किंवा देशीवादी-ब्राह्मणी-स्त्रीवादी साहित्य हे सारे प्रवाह आदिवासी साहित्यासाठी आदर्श असू शकत नाहित. तसेच आदिवासी साहित्य, संकल्पना, व्याप्ती, स्वरूप, व्याख्या, आदिवासी साहित्य समोरील आव्हाने यासंबंधी आपल्या विवेचनातून विचारमंथन केले. दुसऱ्या सत्रामध्ये “आदिवासी साहित्य व साहित्याची लक्षणे” या विषयावर महत्त्वाचा परिसंवाद झाला. पुणे विद्यापीठाचे डॉ. तुकाराम रोंगटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महत्त्वपूर्ण परिसंवादात प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, साहित्यिक संजय दोबाडे, तसेच राजू ठोकळ सतीश लेंभे तसेच आदिवासी साहित्याचे अभ्यासक रवी बुधर यांनी महत्त्वपूर्ण विषयाची मांडणी केली.

जवळपास 50 पेक्षा अधिक कवींचा सहभाग असणारे काव्य संमेलन हे या कार्यक्रमातील महत्त्वाच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. काव्य स्पर्धेत विजयी ठरलेल्या कवीला काव्य महाकरंडक यावेळी अध्यक्षांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

आदिवासी समाजात सामाजिक सांस्कृतिक आणि सृजनशील काम करणाऱ्या बांधवांना आदिवासी समाज भूषण पुरस्कार देऊन यावेळेस सन्मानित करण्यात आले. ज्या मध्ये सिनेट सदस्य प्रा नितीन तळपाडे ,विशाल पोटिंदे, सखाराम गांगड, कविराज बोटे जगन्नाथ सावळे, जयेश पाटेकर, जालिंदर आडे, जयंत पटेकर यांचा समावेश होता.
यावेळी दुपारचे सत्रात आ.डॉ किरण लहामटे,आदिवासी साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष, अभ्यासक सुनील गायकवाड , दुपार सत्राचे अध्यक्ष दिगंबर नवांळी यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. यावेळी लिजत पापड संचालक सुरेशराव कोते, मधुकर तळपाडे, प्राचार्य बी. वांय देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ भोये यांनी केले तसेच प्रास्ताविक आयोजकांच्या वतीने कवी तानाजी सावळे यांनी केले.