महिला एसटी प्रवाशां चे दागिने लांबविणाऱ्या दोन महिलांना नेवासे पोलिसांनी केले जेरबंद !

नेवासा – प्रतिनिधी दि 22
एसटी प्रवासा दरम्यान महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलांना नेवासा पोलिसांनी जेरबंद केले आहे
बुधवार दि. 8 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मीरा मच्छिंद्र डेंगळे वय 65 वर्ष रा. लोणी ता. राहता या लोणी प्रवराला जाण्यासाठी भगवानगड ते नाशिक या बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील 42 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी व डोरले कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरले. या बाबत पोलीस ठाणे नेवासा येथे मीरा डेंगळे यांनी फिर्याद दाखल केली होती, या
फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा
गुन्हा नोंदवला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार. अजय साठे, पोलीस नाईक अरुण गांगुर्डे, किरण पवार यांनी हाती घेतला होता. या अनोळखी संशयित महिला चोरांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्या नंतर पोलिस तपासा दरम्यान तातडीने नेवासा बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे संशयित महिला दिसून आल्या होत्या. संशयित महिलांची ओळखपटवण्यासाठी नेवासा पोलिसांनी मागील सात दिवस नेवासा ते श्रीरामपूर बस स्थानकापर्यंत पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली तसेच त्या रहात असलेल्या ठिकाणापर्यंत सीसीटीव्ही फुटेजतपासणी
करून नावे निष्पन्न केली.
नेवासा पोलीस सदर संशयित महिलांच्या घरा पर्यंत पोहोचताच व पोलिसांना पाहताच कावऱ्याबावऱ्या झाल्या त्यांना नेवासा बसस्थानकातील चोरी बाबत विचारपूस केली असता सुरुवातीला नकार दिला परंतु पॉलिसी खाक्या दाखवण्याची भिती घालताच नेवासा बस स्थानक येथे सोन्याचे दागिने चोरी केले बाबत कबुली दिली. तसेच फिर्यादी महिलेचे चोरलेले सोन्याचे दागिने काढून दिले.
सदर कांताबाई कमल लोंढे व सरस्वती दत्तू खंडारे दोन्ही रा. अशोक नगर, श्रीरामपूर या महिलांना ताब्यात घेऊन अटकेची कार्यवाही केली आहे. यापूर्वी देखील नेवासा बस स्थानक येथून चोरीच्या घटना घडलेल्या आहेत या घटनेमध्ये या अटक महीला आरोपी महिलांचा काही संबंध वगैरे आहे का याचा देखील तपास केला जाणार आहे.