राहाता तहसील कार्यालयात राष्ट्र ध्वजवंदन सोहळा संपन्न

अनेक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाची विकासाकडे वाटचाल – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
शिर्डी, दि. २६: – राहाता तहसील कार्यालयात ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय राष्ट्र ध्वजवंदन सोहळा शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. ” देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या या ७५ वर्षाच्या काळात अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. अनेक लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून नागरिकांची काळजी घेण्यात येत असून देश विकासाकडे वाटचाल करत आहे”, असे गौरवोद्गार श्री. कोळेकर यांनी काढले.
यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नवनाथ लांडगे, बाळासाहेब मुळे, सुधाकर ओहोळ, राहाता नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, उपअभियंता के.बी.गुंजाळ, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, भूमी अभिलेख उपअधीक्षक योगेश थोरात, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत श्री.कोळेकर म्हणाले, अन्नसुरक्षा, प्रधानमंत्री आवास, आयुष्यमान भारत, हर घर जल यांसारख्या योजनांच्या माध्यमातून देशातील नागरिकांची काळजी घेतली जात आहे. अहिल्यानगर- मनमाड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. सावळीविहीर येथे एमआयडीसीच्या कामास सुरुवात झाली आहे. पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. शिर्डीत साईबाबांच्या जीवनमानावर आधारित थीम पार्कच्या कामास मंजुरी मिळाली आहे. साई संस्थानच्या माध्यमातून अद्यावत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स साकारणार आहे. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू असून या इमारतीच एक हजार प्रेक्षक क्षमतेचे प्रेक्षागृह साकारणार होणार आहे. या विकास कामांमुळे शिर्डी व परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ॲग्रीस्टॅक योजनेत सहभागी शेतकरी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यामध्ये बाबासाहेब गोपीनाथ डावरे, शामराव काशिनाथ रोहोम (साकुरी), अरुण रघुनाथ म्हेत्रे (राहाता), तानाजी दत्तात्रय चुळभरे, सुभाष दत्तात्रय चुळभरे (पिंपळस), सूर्यकांत शशिकांत एलम, सुनील तुकाराम आभाळे, (नांदुर खु.), घनश्याम शिवलाल कुमावत, चंद्रभान रखमाजी गोरे (नांदुर बु.) या शेतकऱ्यांचा समावेश होतो. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मंगल सुभाष वाघमारे, अरुण रावसाहेब बोर्डे, सदगिर पांडुरंग दिनकर यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राहाता पोलीस कर्मचारी पथक, शारदा आणि डांगे विद्यालयाच्या भारत स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी परेड संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमानंतर अपर जिल्हाधिकारी श्री. कोळेकर यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले.