श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयात राज्यस्तरीय सायबर सुरक्षा कार्यशाळा संम्पन्न

संगमनेर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग (एनएसएस) आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा समारोप राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथील प्रा डॉ सागर जांभोरकर, डॉ वसंत खरात, प्रा सीताराम कवडे, महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल देशमुख, एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा रामदास सोन्नर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यशाळेत राज्यातील अनेक महाविद्यालयातून १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आणि कार्यशाळा व्यवस्थापनाबद्दल भरभरून कौतुक केले.
या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य नंदलाल पारख आणि फर्स्ट क्राय कंपनीचे सेक्युरिटी ॲनालिस्ट प्रतीक फड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या तीन दिवसीय कार्यशाळेत सायबर सुरक्षा, त्यातील आव्हाने आणि त्यावरील उपाय अशा अनेक विषयावर राज्यभरातील तज्ञ व्यक्तींनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रतीक फड यांनी इंट्रोडक्शन टू सायबर सेक्युरिटी तर दुसऱ्या सत्रात प्रा सिताराम कवडे यांनी सायबर अवेअरनेस विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात निवृत्त पोलिस आयपीएस अधिकारी दिलपाल सिंग राणा आणि सायबर संस्कार कंपनीचे डॉ तन्मय दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तर तिसऱ्या दिवशी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रा डॉ सागर जांभोरकर यांनी सायबर सेक्युरिटी या विषयावर विद्यार्थ्यांशी
संवाद साधला.
या समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बालाजी नरवटे यांनी केले यांनी तर आभार प्रा रामदास सोन्नर यांनी मानले. महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक सचिन वालझाडे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.