सावरगाव घुलेत तीन दिवस खंडोबाचा यात्रोत्सव!

, संगमनेर प्रतिनिधी
तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील प्रति कोरठण समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवाचा यात्रोत्सव तीन दिवस पार पडणार असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबरच बैलगाडा शर्यत या यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
स्वयंभू श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव शनिवार दि. १२ ते सोमवार दि. १४ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मल्हारी महात्मे पारायण आणि अभिषेक, सकाळी ८ वाजता मांडव डहाळे, सायंकाळी ६ वाजता मानाची काठी आणि पालखी मिरवणूक छबिना व शोभेचे दारू काम, रात्री ८ ते १० संध्या माने सह रोहन माने सोलापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा, रविवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता देवस्थान महाआरती, सकाळी ९ ते ११ वाजता तमाशा हजेरी, सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ५ वाजता आमदार डॉ. किरण लहामटे आणि आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी बैलगाडा मालकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ वाजता एलईडी स्क्रीनवर नवरदेव हा बहुचर्चित चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवार १४ एप्रिल रोजी ४ ते ६ वाजता कुस्त्यांचा हगामा होणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते ७ देव पालखी मिरवणूक छबिना व तळी भंडार असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडून या यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. या यात्रा उत्सवाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
या यात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी आयोजकांनी मोठ मोठी बक्षिसे ठेवली आहेत.
आमदार डॉ. किरण लहामटे मित्र मंडळाच्या वतीने प्रथम बक्षीस ४१ हजार रुपये असून द्वितीय बक्षीस आमदार अमोल खताळ यांच्याकडून ३१ हजार रुपये आहे. तृतीय बक्षीस गौरव डोंगरे यांच्याकडून २१ हजार रुपये तर इतर उत्तेजनार्थ बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बैलगाडा मालकांनी या बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.