श्रीरामपूर तालुक्यातील कालवा दुरुस्तीच्या कामांना निधी देण्यात येईल- राधाकृष्ण विखे पाटील

भंडारदारा धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करु,
शिर्डी, दि.२१ – श्रीरामपूर तालुक्यातील कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या सूचना विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या असून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे सुमारे १२ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ तसेच ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच किशोर बनकर, महेश खरात, पुष्पा भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते
मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, अतिरीक्त पाणी निर्माण करून गोदावरीचे तुटीचे खोरे दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला गती देण्यास शासनाचे प्राधान्य आहे. जिल्ह्यातील भंडारदारा धरणात अतिरिक्त पाणी निर्माण करणे, मुळा धरणातील गाळ काढून उंची वाढवणे या कामाला गती देण्यात येणार असून नदीजोड प्रकल्पाची काम पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

पढेगाव ग्रामपंचायतीने सुरू केलेले वाचनालय हे लोकशिक्षणाचे मंदीर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त पालकमंत्री म्हणाले, सोशल मिडीयाचा उपयोग वाढत असतांनादेखील वैयक्तिक प्रगतीसाठी वाचनाशिवाय पर्याय नाही. कृत्रिम बुद्धीमत्तेचे मोठे आव्हान आपल्यासमोर येत आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासोबत वाचनाची सवयही महत्वाची आहे. वाचनालयातून स्पर्धा परीक्षांचे केंद्र सुरू करावे, यासाठी लागणारे संगणक उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही श्री.विखे पाटील यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून लोकाभिमुख निर्णयातून विकास प्रक्रीया अधिक वेगाने सुरू आहे. प्रत्येक निर्णय आणि योजना लोकाभिमुख असून, योजनामुळे शहर आणि ग्रामीण भागात परिवर्तन होत आहे. देशामध्ये संविधानच्या आधारावर विकासाची प्रक्रिया सुरू असून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेत त्याचे प्रतिबिंब ठळकपणे दिसून येते. देशातील ८० टक्के लोकांना मोफत धान्य, पीक विमा, लाडकी बहीण योजना, महात्मा फुले आरोग्य योजना आदी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याचेही श्री. विखे पाटील म्हणाले.
यावेळी श्री.विखे पाटील यांची पुस्तक तुला करून ग्रामस्थांच्यावतीने सन्मानित करण्यात आले.
**