अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
श्रीरामपूर दि 21- येत्या काळात श्रीरामपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहर हरित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंद वाघ आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, जलजीवन मिशनचे काम करतांना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाइप खराब होऊ नयेत यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणाऱ्या ठेकेदारांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांची, अनियमितेची चौकशी करण्यात यावी.
त्रुटींची दुरूस्ती करून पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. ज्या गावांना पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले.
महावितरण कामांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात ३ हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसुम’ आणि ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सोलर पंप वितरित करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून ४० कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात २० लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे विज दिली जाणार आहे . श्रीरामपूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही श्री.विखे पाटील यांनी दिली.
ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला.
या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.