नॉर्दन ब्रांच कालव्यावरील अतिक्रमण काढणार-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर दि.२१ – नॉर्दन ब्रांचच्या ४४ किलोमीटरच्या कालव्याच्या नूतनीकरणाच्या कामास आजपासून सुरुवात झाली असून यामाध्यमातून या कालव्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्यात येणार आहे. या कालव्यांच्या अतिक्रमण कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबांना म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
श्रीरामपूर येथील प्रवरा डाव्या कालव्यावरील वितरिका क्र.१२ व १५ तसेच मिल्लतनगर येथील नॉर्दन ब्रांच वितरिका क्र.१ च्या नूतनीकरण कामांचे भूमिपूजन प्रसंगी पालकमंत्री श्री.विखे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब आवटी, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, तालुक्यातील कालव्यांच्या सर्व चाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून लाख कालव्यांच्या कामांसाठी साडेसहा कोटी मंजूर करण्यात आले आहेत. नॉर्दन कालव्यावरील अतिक्रमण काढून स्वच्छया करण्यात येणार आहे. कालव्यावरील अतिक्रमण काढून कालव्याचा काही भाग बंदिस्त करून हरित करण्यात येईल. श्रीरामपूर शहर अतिक्रमणमुक्त करून शहराचे सुयोग्य नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येत्या काळात स्थानिक तरुणांना रोजगार संधी निर्माण करण्यासाठी निर्णय घेण्यात येतील. निळवंडे व भंडारदरा धरणातील कालव्यातून शेतीला शाश्वत पाणी देण्यासाठी काम करण्यात येईल. अधिक क्षेत्राला पाणी देण्यासाठी जलसंपदा विभाग तत्परतेने काम करत आहे, असेही श्री.विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी हेरंब आवटी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी पालकमंत्र्यांनी कालव्याची पाहणी केली.
या दौऱ्यात पालकमंत्री श्री.विखे पाटील यांच्याहस्ते श्रीरामपूर नगरपरिषदेच्या फायर स्टेशनचे बांधकाम व मेनरोडवरील भाजी मंडई समोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.