केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सल्लागार प्रमुख परिमल बनाफर यांचा अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा !

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न
अहमदनगर दि. २४ — केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे सल्लागार प्रमुख परिमल बनाफर यांनी अलीकडेच अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करून नैसर्गिक, सेंद्रिय व संरक्षित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. ग्रामीण विकास व शेती सक्षमीकरणाच्या उद्देशाने झालेल्या या दौऱ्यात अकोले, संगमनेर आणि राहाता तालुक्यांतील शेतकरी गटांशी त्यांनी चर्चा केली.
या दौऱ्यात शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक प्रशिक्षणाची कमतरता, जैविक बियाणे व खते यांची उपलब्धता, हवामान बदलाचा पिकांवर होणारा परिणाम, उत्पादनाची बाजारपेठांपर्यंत पोहोच व मूल्यनिर्धारण यांसारख्या महत्त्वाच्या अडचणी मांडल्या.
श्री.बनाफर यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व नीती आयोगाच्या पुढील धोरणात आवश्यक बदल सुचविण्यात येतील, असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले. त्यांनी शाश्वत शेतीचा अवलंब, स्थानिक स्तरावर प्रशिक्षण केंद्रांची गरज आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठांशी जोडण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याची गरज अधोरेखित केली.
शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीद्वारे उत्पादन खर्चात बचत करताना उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करावे, तसेच अशा शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकरी समूहांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन कराव्यात, असा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्र. उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद कुलाळ, संगमनेर तालुका कृषी अधिकारी श्रीमती रेजा बोडके, अकोले तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, तसेच मंडळ कृषी अधिकारी रवींद्र रोकडे (अकोले), श्री राजेंद्र बिन्नर (समशेरपूर), श्री चोपडे (राहाता) आणि विविध क्षेत्रीय कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीविषयी जागरूकता निर्माण झाली असून, शाश्वत शेतीप्रती सकारात्मक पाऊल उचलल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.